Kohinoor Diamond: भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधांमध्ये अनेकदा वादाचा विषय ठरणारा कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी थेट ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडे हा हिरा भारताला परत करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे कोहिनूर कधीतरी मायदेशी परतणार का, हा जुना प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ब्रिटिश कायद्याची ढाल
कोहिनूर भारताला परत करण्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा हा ब्रिटनचा कायदा आहे. ब्रिटिश म्युझियम अॅक्ट 1963 नुसार, ब्रिटनची राष्ट्रीय संग्रहालये त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तू कायमस्वरूपी दुसऱ्या देशाला परत करू शकत नाहीत.
कोहिनूर सध्या ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा भाग असून तो लंडन टॉवरमध्ये ठेवण्यात आला आहे. याच कायद्याचा आधार घेत ब्रिटिश सरकार वारंवार कोहिनूर परत देण्यास नकार देत आले आहे.
(नक्की वाचा : Maharashtra Day 2026: 106 हुतात्मे अन् अथांग संघर्ष! मुंबईसाठी मराठी माणसाने दिल्लीला कसं झुकवलं? वाचा सविस्तर )
नव्या कायद्याने काय होणार?
ब्रिटीश सरकारने 2022 मध्ये चॅरिटी अॅक्ट नावाचा एक नवीन कायदा आणला आहे. या कायद्यानुसार, काही विशेष प्रकरणांमध्ये नैतिक आधारावर कलाकृती परत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र, तज्ज्ञांच्या मते हा कायदा इतका मर्यादित आहे की कोहिनूरसारखी महत्त्वाची ऐतिहासिक वस्तू या माध्यमातून परत मिळणे जवळपास अशक्य वाटते. ब्रिटनच्या दृष्टीने ही केवळ कायदेशीर बाब नसून त्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाचा देखील भाग आहे.
( नक्की वाचा : Digital Census 2026: तुमची जनगणना तुमच्या हातात! मोबाईलवरून माहिती भरा, आणि राहा निर्धास्त! वाचा सर्व माहिती )
ब्रिटीश संग्रहालयांचा गडगंज नफा
ब्रिटीश म्युझियम आणि व्ही अँड ए सारखी संग्रहालये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे आधारस्तंभ आहेत. जगभरातून करोडो पर्यटक या वस्तू पाहण्यासाठी लंडनला येतात, ज्यामुळे ब्रिटनला दरवर्षी अब्जावधी पाउंडची कमाई होते.
आपली ऐतिहासिक चूक मान्य करून या वस्तू परत केल्यास पर्यटनावर परिणाम होईल, अशी भीती ब्रिटनला वाटते. म्हणूनच ते या वस्तूंना केवळ एका देशाची मालमत्ता न मानता जागतिक वारसा असल्याचे सांगतात.
गोळकोंडा ते लंडन असा आहे प्रवास
कोहिनूरचा इतिहास भारताच्या मातीशी जोडलेला आहे. हा हिरा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागातील गोळकोंडा खाणीतून मिळाल्याचे मानले जाते. मुघल सम्राट शाहजहानच्या मयूर सिंहासनाचा तो कधीकाळी भाग होता. त्यानंतर 1739 मध्ये नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण करून हा हिरा इराणला नेला.
पुढे तो अफगाण शासकांकडे गेला आणि 1813 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी तो पुन्हा भारतात आणला. शिख साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेला हा हिरा 1849 मध्ये इंग्रजांनी ताब्यात घेतला. त्यावेळी महाराजा दलीप सिंह हे केवळ 10 वर्षांचे होते आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने कोहिनर हिरा ताब्यात घेण्यात आला.
भारताचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच 1950 च्या दशकापासून भारताने अनेकदा कोहिनूर परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केवळ भारतच नाही, तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताननेही या हिऱ्यावर आपला दावा सांगितला आहे. मात्र, भारतासाठी हा केवळ एक हिरा नसून तो ब्रिटीश राजवटीत झालेल्या लुटीचे आणि अपमानाचे प्रतीक बनला आहे. सध्याचे कायदे आणि ब्रिटनची भूमिका पाहता कोहिनूर लगेच परत येईल अशी चिन्हे नसली, तरी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या दबावामुळे हा वाद संपण्याची शक्यता दिसत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world