Digital Census 2026: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसंख्येची मोजणी कागद-पेन सोडून डिजिटल अवतारात होणार आहे. 2026-27 ची जनगणना तुमच्यासाठी केवळ एक सरकारी प्रक्रिया नसून, ती आता तुमच्या स्मार्टफोनचा एक भाग होणार आहे. विशेष म्हणजे, तासनतास घराबाहेर उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा कंटाळवाणा प्रवास आता संपणार आहे. केंद्र सरकार 'सेल्फ-एन्युमरेशन' म्हणजेच 'स्व-गणना' हा नवा पर्याय घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती स्वतःच भरू शकाल.
काय आहे ही 'स्व-गणना' आणि तुम्हाला काय फायदा?
सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करता किंवा एखादी वस्तू ऑर्डर करता, अगदी तसेच आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरता येईल. यापूर्वी जनगणना अधिकारी घरी यायचे आणि लांबलचक प्रश्न विचारायचे. आता मात्र सरकार तुम्हाला 'सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल'ची चावी देणार आहे.
तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार माहिती भरली की, सिस्टिम तुमच्यासाठी 11 अंकी एक खास 'SE ID' तयार करेल. जेव्हा अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्हाला फक्त हा आयडी दाखवायचा आहे. तुमची जनगणना काही सेकंदात पूर्ण होईल.
( नक्की वाचा : Kolhapur News:नाशिक, अमरावतीनंतर आता कोल्हापूर! प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओचं रॅकेट उघड )
कसे काम करणार हे नवीन डिजिटल पोर्टल?
हे पोर्टल वापरणे सोशल मीडिया अकाउंट लॉगिन करण्याइतकेच सोपे असणार आहे. तुम्हाला फक्त (se.census.gov.in) या पोर्टलवर जायचे आहे. कुटुंबाचा प्रमुख स्वतःच्या मोबाईल नंबरने लॉगिन करेल, ज्याची पडताळणी ओटीपी (OTP) द्वारे केली जाईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पोर्टल एकूण 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. यामध्ये मॅपचा पर्याय देखील असेल, जिथे तुम्ही तुमच्या घराचे अचूक लोकेशन मार्क करू शकाल. सर्व माहिती भरून 'फायनल सबमिट' केल्यावर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे 11 अंकी SE ID पाठवला जाईल.

सर्व राज्यांसाठी एकच खिडकी आणि सोपी पद्धत
अनेकदा मनात शंका येते की प्रत्येक राज्यासाठी वेगळी वेबसाईट असेल का? तर त्याचे उत्तर 'नाही' असे आहे. संपूर्ण देशासाठी एकच 'नॅशनल सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल' असेल. तुमच्या राज्यात जेव्हा प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार असेल, त्याच्या बरोबर 15 दिवस आधी हे पोर्टल तुमच्यासाठी खुले केले जाईल. यामुळे वेबसाईटवर एकाच वेळी ताण येणार नाही आणि नागरिकांनाही शांतपणे माहिती भरता येईल.
माहिती ऑनलाइन भरली तरी अधिकारी घरी का येणार?
हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. खरं तर हे एक 'हायब्रिड मॉडेल' आहे, जे तुमच्या माहितीची सुरक्षा आणि अचूकता तपासण्यासाठी डिझाइन केले आहे. अधिकारी तुमच्या घरी येतील, तेव्हा ते फक्त तुमचा SE ID त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये टाकतील. तुम्ही भरलेली माहिती त्यांच्यासमोर आधीच असेल, ती फक्त एकदा 'क्रॉस-चेक' केली जाईल. जर काही बदल करायचा असेल, तर तो तिथेच अपडेट केला जाईल. यामुळे कागदी कामात होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि देशाकडे भविष्यातील धोरणे आखण्यासाठी एक भक्कम आणि विश्वसनीय डेटा तयार होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world