रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin ) आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या भेटीनंतर एक विचित्र प्रकार समोर आला आहे. किम यांच्या कर्मचाऱ्यांनी बैठकस्थळी 'थ्रिलर' सिनेमाला शोभेल अशा पद्धतीने डीएनएचे ट्रेस पुसून टाकले. या घटनेचे फुटेज व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
किम आणि पुतिन यांच्यातील चर्चा संपताच किम यांचे कर्मचारी लगेच कामाला लागले. त्यांनी किम बसलेल्या खुर्चीचा प्रत्येक भाग, तिच्या बाजूची जागा आणि त्यांनी स्पर्श केलेला पाण्याचा ग्लासही अतिशय काळजीपूर्वक पुसून घेतला. ही घटना रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशेव्ह यांनी उघडकीस आणली. 'मी जे काही पाहिले ते अविश्वसनीय होते,' असे युनाशेव्ह यांनी म्हटले आहे.
किम यांच्या या वागण्यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते, त्यांना रशिया किंवा चीनकडून त्यांच्या जैविक माहितीची चोरी होण्याची भीती आहे.
( नक्की वाचा : Donald Trump : धक्कादायक खुलासा! नोबेलसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन, 'ती' मागणी फेटाळताच संबंध बिघडले )
या भेटीत किम यांनी रशियाला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले. याशिवाय, पुतिन यांनी युक्रेनच्या युद्धात उत्तर कोरियाने पाठवलेल्या सैनिकांचे आभार मानले. यामुळे, पाश्चात्त्य देशांविरुद्ध एकत्र आलेल्या या दोन्ही देशांमधील मैत्री अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले आहे.
पुतिनही घेतात खबरदारी
डीएनए ट्रेस मिटवण्याची ही खबरदारी केवळ किम यांच्यापुरती मर्यादित नाही. रशियाचे अध्यक्ष पुतिनही असे उपाय करतात. 2017 पासून, जेव्हा जेव्हा ते परदेशात प्रवास करतात, तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्या मूत्राचे आणि शौचाचे नमुने सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा करतात.
याच नियमाचे पालन पुतिन यांनी अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान केले होते, त्यावेळी रशियन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुतिन यांचा कचरा सूटकेसमध्ये भरून मॉस्कोला नेला होता.
रशिया आणि उत्तर कोरियाची मैत्री
बीजिंगमधील चर्चेदरम्यान, किम यांनी मॉस्कोसोबत पूर्ण एकजुटीची शपथ घेतली. ते पुतिन यांना म्हणाले, "तुमच्यासाठी आणि रशियन लोकांसाठी मी काहीही करू शकत असेन, तर ते करणे मी माझे कर्तव्य मानतो." यावर पुतिन यांनी "प्रिय राज्य व्यवहार अध्यक्ष" असे संबोधून त्यांना प्रतिसाद दिला.
पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्याबद्दल प्योंगयांगचे आभार मानले. जरी रिपोर्ट्सनुसार, पाठवलेल्या 13,000 उत्तर कोरियाच्या सैनिकांपैकी जवळपास 2,000 सैनिक मारले गेले आहेत.
कोरोना महामारीनंतर किम यांचा चीनचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यात त्यांना पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासह दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या शरणागतीनिमित्त एकत्र आलेल्या 24 पेक्षा जास्त जागतिक नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली. 2024 च्या संरक्षण करारामुळे मॉस्को आणि प्योंगयांग दशकांतील सर्वात जवळचे मित्र बनले आहेत, जे पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांना विरोध करून एकत्र आले आहेत.