
Donald Trump PM Modi Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील एका फोन कॉलमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 'सोडवल्याचा' दावा करत मोदींकडे नोबेल शांती पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस करण्याची मागणी केली होती. मात्र, मोदींनी ही मागणी स्पष्टपणे फेटाळल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जाते.
नेमके काय घडले?
17 जून, 2025 रोजी झालेल्या फोन कॉलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, त्यांनीच भारत आणि पाकिस्तानमधील सैन्य संघर्ष 'सोडवला' आहे. पाकिस्तान नोबेल शांती पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करणार असून, भारतानेही असेच करावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, मोदींनी ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे नाकारला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी त्यांच्या थेट चर्चेतून झाली असून, यात अमेरिकेचा कोणताही सहभाग नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर मोदी अत्यंत निराश झाले होते, असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी नकार दिल्यानंतरही ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्यांची सार्वजनिकपणे पुनरावृत्ती केली, ज्यामुळे भारताची नाराजी वाढली. या घटनेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही.
( नक्की वाचा : Exclusive Video : IAF चा मोठा खुलासा: 'ऑपरेशन सिंदूर'च्या हल्ल्यांचे नवे व्हिडिओ NDTV डिफेन्स समिटमध्ये जारी )
ट्रम्प यांचा डाव काय होता?
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालापूर्वी 'ब्लूमबर्ग'नेही याच फोन कॉलची माहिती दिली होती. त्या 35 मिनिटांच्या संभाषणात मोदींनी ट्रम्प यांच्या दाव्यांना स्पष्टपणे फटकारले होते. "भारत कोणत्याही परिस्थितीत मध्यस्थी स्वीकारणार नाही आणि कधीही करणार नाही," असे मोदींनी ट्रम्प यांना सुनावल्याचे अज्ञात भारतीय अधिकाऱ्यांनी ब्लूमबर्गला सांगितले.
या फोन कॉलच्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते, जिथे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत एक 'फोटो-ऑप' आयोजित करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, मोदींनी हे आमंत्रण नाकारले आणि क्रोएशियाच्या दौऱ्याचे कारण देत आपला निर्णय जाहीर केला.
( नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय? )
नोबेलसाठी शिफारस नाकारल्याचे परिणाम
या फोन कॉलच्या काही आठवड्यांनंतर ट्रम्प प्रशासनाने भारतीय आयातीवर 25% शुल्क लादले, जे नंतर 50% पर्यंत वाढवण्यात आले. भारताने रशियन तेल खरेदी केल्याने अमेरिकेने ही कारवाई केल्याचे म्हटले जाते. याचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम झाला.
व्यापार युद्धाव्यतिरिक्त, ट्रम्प प्रशासनाने भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध, एच-1बी व्हिसा धारकांची कठोर तपासणी आणि अवैध भारतीय स्थलांतरितांना देशातून बाहेर काढणे असे निर्णय घेतले. या निर्णयांनी दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढवला.
या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीसाठी चीनला जाण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात पूर्वेकडील देशांकडे झुकण्याचे संकेत मिळाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world