तुम्ही 11 दिवस बिना कपड्यांच्या प्रवासाची कल्पना करू शकता का? जगात एक अशी क्रूझ आहे, जिथे 2,300 प्रवासी बिना कपड्यांच्या प्रवास करतात. हा अनुभव घेण्यासाठी एका व्यक्तीला 43 लाख रुपये मोजावे लागतात. प्रवासाचे अनेक प्रकार आहेत, पण 'न्यूड क्रूझ' हा एक अनोखा आणि वेगळा पर्याय म्हणून समोर आला आहे.
अमेरिकेतील 'बेअर नेसेसिटीज' (Bare Necessities) या कंपनीने आयोजित केलेली ही क्रूझ जगातील सर्वात मोठी न्यूड क्रूझ मानली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही क्रूझ मियामी, फ्लोरिडा येथून निघते आणि कॅरिबियन बेटांवर प्रवास करते. 11 दिवसांच्या प्रवासात प्रवाशांना कोणतेही कपडे घालावे लागत नाहीत.
यामागची संकल्पना म्हणे नॅचरिझम' म्हणजेच निसर्गवादाचे पालन करणारे लोक एका आलिशान क्रूझमध्ये एकत्र येतात आणि कपड्यांच्या बंधनातून मुक्त होऊन सुट्टीचा आनंद घेतात. क्रूझ आयोजकांच्या मते, हा अनुभव लैंगिकतेशी संबंधित नसून तो आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाबद्दल आहे.
काय आहेत नियम?
या क्रूझमध्ये प्रवास करताना काही नियम पाळणे बंधनकारक आहे. जहाजावर असताना कपडे घालणे आवश्यक नाही, पण जेवण करताना, कॅप्टनच्या स्वागतावेळी आणि जहाजावर कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर कपडे घालणे अनिवार्य आहे. कॅमेरा किंवा फोटो काढण्याची परवानगी नाही. कोणत्याही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय काढण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला थारा दिला जात नाही. गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला त्वरित पुढील बंदरावर उतरवले जाते आणि त्यांचे पैसे परत मिळत नाहीत.
ही क्रूझ केवळ 'नॅचरिस्ट' कम्युनिटीसाठी आहे, कोणत्याही 'स्विंगर्स पार्टी' सारखा तिचा उद्देश नाही. 'बेअर नेसेसिटीज' कंपनी 1990 पासून या उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे आणि त्यांचा उद्देश लोकांना कपड्यांशिवाय सुट्टी घालवण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे आहे.
प्रवासाचा खर्च आणि मार्ग
या क्रूझचे तिकीट दर प्रति व्यक्ती 43 लाख रुपयांपर्यंत असू शकतात, जे तुम्ही निवडलेल्या केबिनवर अवलंबून असतात. 2300 प्रवाशांची क्षमता असलेल्या 'नॉर्वेजियन पर्ल' नावाच्या जहाजातून हा प्रवास केला जातो. प्रवासादरम्यान कॅरिबियनमधील एबीसी बेटे, जमैका आणि दोन ठिकाणी ग्रेट स्टिरप के या बेटावर थांबा घेतला जातो. या ठिकाणी प्रवाशांना पूर्ण समुद्रकिनाऱ्याचा वापर 'नो क्लॉथ्स' पद्धतीने करता येतो.