First Afghan Woman to Conquer Mt Everest : अफगाणिस्तानमध्ये आजही महिलांना स्वप्न पाहण्याची परवानगी नाही. ज्या देशात मुलींच्या शिक्षणावर, खेळावर आणि घराबाहेर पडण्यावर तालिबानने अनेक निर्बंध लादले आहेत, तिथल्याच एका लेकीने जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचून इतिहास रचला आहे. ही गोष्ट केवळ माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची नाही, तर युद्ध, गरिबी, तालिबानी हल्ले आणि कौटुंबिक दुःख यावर मात करून मिळवलेल्या विजयाची आहे. झकिया अहमद जिला रिव्हर या नावाने ओळखले जाते, त्यांनी 21 मे 2026 रोजी माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले आणि अशी कामगिरी करणाऱ्या त्या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या अफगाणिस्तानच्या लेकीचं भारताशी देखील खास कनेक्शन आहे.
झकिया अहमदची संघर्षमय गाथा
झाकियाचा जन्म 1990 च्या दशकात अफगाणिस्तानच्या गजनी प्रांतातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे बालपण इतर अफगाणी मुलींप्रमाणेच कठीण होते. शाळेत जाण्यासाठी तिला रोज कित्येक तास पायी प्रवास करावा लागायचा.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शेती आणि जनावरे पाळण्याच्या कामातही त्या कुटुंबाला मदत करायच्या. मुलगा आणि मुलगी यामध्ये समाजात केला जाणारा भेदभाव त्यांना लहानपणीच जाणवला होता.झाकियाला झाडावर चढायला किंवा उंच ठिकाणाहून उड्या मारायला आवडायचे, पण मुलगी असल्यामुळे त्यांना नेहमीच रोखले गेले.
( नक्की वाचा : 'झिंगाडा परतला!' 9 जणांच्या अटकेनंतर समोर आलं अंडरवर्ल्डचं सर्वात खतरनाक नाव; मुंबईवर पुन्हा सावट? )
भारताशी खास कनेक्शन
इतक्या अडचणी असूनही झकियाने तिचे शिक्षण सोडले नाही. शाळेनंतर ती काबुलला गेली. तिथल्या विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यास केला. पुढे त्यांना भारतात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली. भारतात त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली.
भारतात राहतानाही झाकियाचा संघर्ष सुरूच होता. दिवसा शिक्षण आणि रात्री कॉल सेंटरमध्ये नोकरी करून तिने स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च उचलला. याच दरम्यान दिल्लीत राहणाऱ्या अफगाण महिलांच्या समस्यांवर त्या संशोधन करत असताना एका बुरखाधारी व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्या हल्ल्याची खूण आजही तिच्या कपाळावर आहे.
( नक्की वाचा : 26 Lakh Jobs: नोकरी जाणार अशी भीती वाटतेय? 'या' क्षेत्रात 26 लाख जागांची प्रतीक्षा; कुठे आहे संधी,वाचा सविस्तर )
जेव्हा तालिबानने बसवर केला गोळीबार
झकियाच्या आयुष्यातील सर्वात भीषण घटना 2014 मध्ये घडली. विद्यापीठात जाण्यासाठी त्या काबुलचा प्रवास करत असताना तालिबानच्या बंदूकधाऱ्यांनी त्यांची बस रोखली आणि प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला. झकियाने प्रसंगावधान राखत आपल्या चेहऱ्याला रक्ताचा माखला आणि आपण मेल्याचे नाटक केले. यामुळे तालिबान्यांनी तिला सोडले आणि तिचा जीव वाचला. त्या पूर्ण बसमध्ये केवळ 3 प्रवासी जिवंत राहिले होते.
भावाचे स्वप्न आणि एव्हरेस्टवर विजय
त्यानंतर त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला गेले, पण तिथे त्यांच्या धाकट्या भावाने आत्महत्या केली. या धक्क्याने झकिया पूर्णपणे कोलमडली होती. आपल्या भावासोबत तिने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. दुःख बाजूला सारून ती पुन्हा जिद्दीनं उभी केली. ऑस्ट्रेलियात नोकरी आणि कठीण ट्रेनिंग करून त्यांनी आपली तयारी सुरू ठेवली.
एव्हरेस्टवर जाण्यापूर्वी त्यांनी नेपाळ आणि युरोपमधील अनेक शिखरे सर केली. अखेर 21 मे 2026 रोजी त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. झकिया आता अफगाणिस्तानमधील मुलींच्या शिक्षणासाठी जागतिक मोहीम राबवत आहे. झाकियाची ही यशोगाथा तालिबानच्या पाशवी राजवटीला दिलेलं चोख उत्तर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world