आयपीएसचं होतं स्वप्न, पण 12 व्या वर्षी ओढवला मृत्यू; 4 जणांना नवं आयुष्य देऊन गेली वैदेही!

12 वर्षाच्या लेकीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणं कोणत्याही आई-बाबांसाठी धक्कादायक आहे. मात्र वैदहीच्या आई-वडिलांनी अवघ्या दहा मिनिटात तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात राहणारी वैदेही तानवडे, वय अवघे 12. शाळेत शिकणाऱ्या या मुलीला एक दुर्मीळ आजार झाला आणि तिला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं. 12 वर्षाच्या लेकीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणं कोणत्याही आई-बाबांसाठी धक्कादायक आहे. मात्र वैदहीच्या आई-वडिलांनी अवघ्या दहा मिनिटात तिच्या अवयवदानाचा (Organ Donation) निर्णय घेतला. यातून आपली लेक कायम जिवंत राहिल आणि तिच्यामुळे इतरांना जीवदान मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.  

वैदेहीचे आई वडील जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचं काम करतात. लेकीच्या आजारपणात तिच्यासोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी नोकरीही सोडून दिली. सप्टेंबर 2020 मध्ये वैदेही भाऊ तानावडे हिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक परपुरा (ITP) या गंभीर आजाराचं निदान झालं. या उपचाराचा एक भाग म्हणून तिला इम्युनोसप्रेसेंट्स आणि मॉड्युलेटर्सवर ठेवण्यात आले होते. सप्टेंबर 2022 मध्ये तिला इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन (IVIG) प्राप्त झाले. त्यानंतर 13 जून, 2023 आणि 10 जुलै, 2024 रोजी तिला पॅक्ड रेड ब्लडसेल्स (PRBCs) चं संक्रमण झालं.

हळूहळू तिची तब्येत ढासळत गेली. 13 जुलै रोजी पहाटे वैदेहीला अचानक अशक्तपणामुळे एन्सेफॅलोपॅथी (मेंदूसंबंधीत बिघाड) आणि हेमेटेमेसिस (रक्ताच्या उलट्या) होऊ लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सीटी स्कॅनमध्ये हर्नियेशनसह गंभीर इंट्राकॅनियल रक्तस्त्राव झाला आणि तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर अवयवदानाबाबत तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले आणि तिचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्यात आले. मात्र या एका निर्णयामुळे आपली मुलीमुळे इतर 4 जणांना जीवनदान मिळाल्याचा समाधान तिच्या आई वडिलांना आहे.

नक्की वाचा - आईची मेहनत, मुलाची जिद्द! भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा बनला सीए

काय आहे नेमका आजार?
इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया हा एक दुर्मीळ रक्तविकार आहे. या आजारात रक्त गोठण्याची क्रिया होत नाही. तुम्हाला सहजपणे जखम होऊ शकतात. जखम झाल्यास सर्वसाधारण लोकांपेक्षा अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा शरीरात विनाकारण रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. हा आजार इतका दुर्मीळ आहे की, अजूनही वैद्यकीय क्षेत्रात यावर कायमस्वरूपी तोडगा आलेला नाही. वैदेहीवर उपचार जरी योग्य पद्धतीने सुरू असले तरी या आजाराने तिची पाठ सोडली नाही. या आजराबदल जास्त लोकांना माहिती नाही. त्याबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे.  

Advertisement

अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे. वैदेहीच्या आई-वडिलांनी ही बाब त्यांच्या कृतीतून दाखवून दिली. मोठेपणी IPS होण्याची स्वप्न बघणाऱ्या वैदेहीला एका आजाराला झुंज देताना मृत्यू ओढवला. मात्र मृत्यूनंतरही ती चार जणांना जीवनदान देऊन गेली. या लढवय्या वैदेहीला आमचा सलाम...