अमजद खान, कल्याण
भाजी विक्रेत्या महिलेच्या मुलाने देशातील कठीण परीक्षांपैकी एक सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आपल्या कष्टाचं चीज झाल्याच्या भावनेने माय-लेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. निरा ठोंबरे असं महिलेचं नाव आहे. तर योगेश ठोंबरे असं सीए झालेल्या मुलाचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निरा ठोंबरे या कल्याणनजीकच्या खोणी गावात राहतात. पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अनेक अडचणींचा सामना करुन कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी हार मानली नाही. खोणी गावातून त्या सकाळीच उठून बाजारात जातात. तेथून भाजीपाला विकत घेऊन त्याची डोंबिवली पूर्वेतील गांधीनगरात जाऊन त्याची विक्री करतात.
जबाबदारीची जाणीव असल्याने एकही दिवस त्यांनी त्यांच्या भाजी विक्रीच्या कामात खंड पडू दिलेला नाही. एक मुलगी आणि दोन मुले आहेत अशा तीन मुलांच्या संगोपणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. एका मुलाचे आणि मुलीचे लग्न करुन दिले. सर्वात लहान मुलगा योगेश हा शाळेत हुशार होता. याच हुशारीच्या जोरावर त्याने कठीण अशी सीएची परीक्षा पास केली आहे.
(नक्की वाचा - पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ'ची स्थापना)
माझी काळजी करु नकोस, योगेश आपल्या आईला नेहमी सांगत असे. अखेर सीए परीक्षेत यशस्वी होत योगेशनेही आईच्या कष्टाचे चीज केले आहे. सीए झालेल्या योगेशने आईला साडी आणली होती. तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित असलेले सर्वजण भारावले. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माय-लेकाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
(नक्की वाचा - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले)
योगेश, तुझा अभिमान आहे.
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) July 14, 2024
डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला.
निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या… pic.twitter.com/Mf8nLV4E61
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे .योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. निरा ठोंबरे यांचे कष्ट आणि योगेशची जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world