Navi Mumbai Crime : 15 वर्षीय मुलाचे अपहरण, 12 लाखांची मागणी; पोलिसांनी सूत्रं हालवली अन्...

मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रथमेश गडकरी, नवी मुंबई

नवी मुंबईतील घणसोली परिसरात आर्थिक वादातून एका 15 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र कोपरखैरणे पोलिसांनी अवघ्या दीड तासात आरोपींचा छडा लावत मुलाची सुखरूप सुटका केली. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजीव भोसले हे घणसोली सेक्टर 3 मध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. काल रात्री त्यांच्या मुलाचे चार अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी भोसले यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.मात्र तक्रार दाखल होताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत गुप्त तपास सुरू केला. 

(नक्की वाचा -  बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! तरुणाचे अपहरण करुन जबर मारहाण, नव्या VIDEO ने जिल्हा हादरला)

तांत्रिक माहितीच्या आधारे तीन विशेष पथक तयार करण्यात आली. यांच्या साहाय्याने आरोपींची सोशल मीडिया प्रोफाइल तपासून, अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या रंगांच्या स्कोडा गाडीचा शोध घेण्यात आला. यातूनच अवघ्या दीड तासाच्या प्रयत्नांनंतर रबाळे एमआयडीसी परिसरातून आरोपी राज भालेराव आणि सतीश गरुड यांना अटक करण्यात आली. आरोपी मुलाला नाशिकला घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.

(नक्की वाचा : Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार ))

मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या कारवाईबाबत सांगितलं की, "घटनेनंतर आम्ही तातडीने कारवाई करत तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा छडा लावला. पालकांच्या सहकार्यामुळेही ही कारवाई शक्य झाली." 

Advertisement

कोपरखैरणे पोलिसांच्या धडाडीची कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी हालचालीमुळे अपहरण प्रकरणाचा वेळीच उलगडा होऊन एक निरपराध बालकाला सुरक्षितरित्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

Topics mentioned in this article