देवा राखुंडे
वीट भट्टीवर काम करण्यासाठी मजूरांची गरज असते. हे मजूर वेगवेगळ्या राज्यातून येतात. त्यांना आणण्याचं काम मुकादम करत असतो. हाच मुकादम विट भट्टी मालकांना मजूर पुरवतो. उत्तर प्रदेशातून असेच मजूर पुण्यात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने वीट भट्टी मालकांकडून कामाचे आगाऊ पैसे घेतले होते. मात्र ते पैसे घेवून तो तिथून पसार झाला. त्यामुळे चिडलेल्या वीटभट्टी मालकाने जवळपास 20 विटभट्टी मजूर आणि त्यांच्या 12 लहान मुलांना नजर कैदेत ठेवले होते. जवळपास 32 जणांना एका खोलीत डांबल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व मजूरांना आणि त्यांच्या मुलांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने इंदापूर तहसील व पोलीस प्रशासनाने सुटका केली आहे. शिवाय या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख गुलाब शाह हसन याच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूख हे उत्तर प्रदेशच्या हसनपुरचे रहिवाशी आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. वेदप्रकाश, सचिन अशोक शिंदे, कुमार गोकुळ दिवसे, राहुल नारायण शेटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व इंदापूर तालुक्यातील आहेत.
पोलिसांनी दिलेलं माहितीनुसार,उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त तसेच जनसाहस या संस्थेला यांना बंदी करून नजर कैदेत ठेवल्याचे समजले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. मुकादमाला दिलेले पैसे भेटत नाही, तोपर्यंत सर्व कामगारांनी या ठिकाणी काम करावे लागेल असा वीट भट्टी मालकाने दम दिला होता. तसेच इथून तुम्ही जाऊ शकत नाही असे ही या मजूरांना सांगण्यात आले होते. या सर्वांची अडवणूक करून त्यांना जाण्यास विरोध करण्यात आला. शिवाय सर्वांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.
इंदापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने इंदापूर नरुटवाडी आणि भांडगाव,ता.इंदापूर, या ठिकाणाहून मंगळवारी 14 ऑक्टोबर ते शनिवारी 18 ऑक्टोबर पर्यंत 32 पैकी दहा पुरुष दहा महिला आणि बारा लहान मुले या सर्वांना प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयाच्या आवारात राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी या सर्वांना खाजगी वाहनाने उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आले. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.