दिवाळीचा सण जवळ येताच देशातील मिठाई बाजार सजला आहे. पण यंदा 'पिंक सिटी' जयपूरने लक्झरी आणि क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत एक नवीन विक्रम केला आहे. जयपूरच्या बाजारपेठेत सध्या 'स्वर्ण प्रसादम' (Swarn Prasadam) नावाची एक खास मिठाई चर्चेत आहे. ज्याची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसेल. ही मिठाई ₹1.11 लाख रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सध्या देशातील सर्वात महागडी मिठाई असल्याचे बोलले जात आहे.
₹3,000 किमतीचा एक पीस
जयपूरमधील अंजली जैन यांच्या आउटलेटमध्ये ही खास मिठाई तयार करण्यात आली आहे. एनडीटीव्हीशी बोलताना अंजली जैन यांनी सांगितले की, ही मिठाई केवळ चवीसाठी नव्हे, तर आरोग्य आणि शाही वैभवाचा अनुभव देण्यासाठी बनवण्यात आली आहे. या मिठाईचा एक पीस ₹3,000 किमतीला मिळतो. यामध्ये चिलगोजा, प्रीमियम केसर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध स्वर्ण भस्म (Pure Gold Ash) वापरले जाते.
स्वर्ण भस्म आणि ज्वेलरी बॉक्स पॅकेजिंग
अंजली जैन यांच्या म्हणण्यानुसार, आयुर्वेदामध्ये स्वर्ण भस्मला रोगप्रतिकारशक्ती (Immunity Booster) वाढवणारे मानले जाते. त्यामुळे ही मिठाई चवीसोबत आरोग्याचीही काळजी घेते. मिठाईच्या वरील सोनेरी लेपन (Glazing) तिला एक आकर्षक 'ज्वेलरी'सारखा लूक देते. ही मिठाई सामान्य बॉक्समध्ये न देता, एका सुंदर ज्वेलरी बॉक्ससारख्या पॅकेजिंगमध्ये दिली जाते. ज्यामुळे तिचे लक्झरी आकर्षण अधिक वाढते.
इतर लक्झरी आणि 'पटाखा थाल'
'स्वर्ण प्रसादम' व्यतिरिक्त, अंजली यांच्या आउटलेटमध्ये ₹85,000 प्रति किलो दराची 'स्वर्ण भस्म भारत' आणि ₹58,000 प्रति किलो दराची 'चांदी भस्म भारत' यांसारख्या इतर महागड्या मिठाई ही उपलब्ध आहेत. या सर्व मिठाई मध्ये बदाम, पिस्ता, काजू तसेच ब्लूबेरी, व्हाइट चॉकलेट यांसारखे 'एक्झॉटिक' आणि प्रीमियम घटक वापरले आहेत. यासोबतच, दिवाळीच्या थीमवर आधारित 'पटाखा थाल' देखील तयार करण्यात आली आहे, ज्यात पारंपरिक काजूची मिठाई 'सुतळी बॉम्ब' किंवा 'अनार'च्या आकारात सजवली आहे. एकंदरीत, दिवाळीचा मिठाई बाजार आता परंपरा, आरोग्य आणि लक्झरीचा संगम बनला आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan | A sweet shop in Jaipur launches a sweet named 'Swarn Prasadam' priced at Rs 1,11,000 infused with 24 carat edible gold, known as Gold ashes or 'Swarn Bhasma' pic.twitter.com/qrZSaYFCn2
— ANI (@ANI) October 18, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world