Police Recruitment : राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पोलीस दलात सहभागी होण्याचं, त्या माध्यमातून देशसेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण या भरतीच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. राज्यातील या पोलीस भरतीला गालबोट लावणारी घटना शनिवारी (29 जून) नवी मुंबईत घडलीय. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडला प्रकार?
नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षांचा तरुण सहभागी झाला होता. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरचा राहणारा होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला. त्यानंतर अत्यावस्थ अवस्थेमध्ये तातडीनं कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : 'भाग मच्छर भाग' साठी बॉलीवूड कलाकारांची मदत घेणार, मराठी कलाकार आणि सेलिब्रिटीही सहाय्य करणार )
अक्षय 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप नातेवाईंकांनी केलाय. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्यांनी काही सेवन केले होते याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.