Vande Bharat Train : पुणेकरांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय रेल्वेने पुणे शहरातून लवकरच चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नवीन गाड्यांमुळे पुणे शहर शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद (हैदराबाद) आणि बेळगाव या महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडले जाईल. या नव्या सेवांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असून, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
सध्या पुणे शहरातून पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या दोन वंदे भारत सेवा कार्यरत आहेत. या चार नव्या वंदे भारत गाड्यांच्या समावेशामुळे पुण्यातून धावणाऱ्या एकूण वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या ६ पर्यंत वाढणार आहे, ज्यामुळे शहरांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
(नक्की वाचा- Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर)
कोणते नवे मार्ग असणार?
पुणे-शेगाव वंदे भारत: या प्रस्तावित मार्गावर दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे थांबे अपेक्षित आहेत. धार्मिक पर्यटकांना आणि भाविकांना मोठा दिलासा या मार्गामुळे मिळेल. कारण शेगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजानन महाराज मंदिरासाठी ओळखले जाते.
पुणे-वडोदरा वंदे भारत: ही हाय-स्पीड रेल्वे लोणावळा, पनवेल, वापी आणि सुरत येथे थांबण्याची शक्यता आहे. पुणे आणि वडोदरा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या ९ तासांवरून अंदाजे ६ ते ७ तासांपर्यंत कमी होईल.
पुणे-सिकंदराबाद वंदे भारत: दोन प्रमुख आयटी (IT) आणि शिक्षण केंद्रांना जोडणारा हा मार्ग दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा असा असण्याची शक्यता आहे. या मार्गावरील सध्याच्या प्रवासाच्या वेळेत २ ते ३ तासांची बचत होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.
पुणे-बेळगावी वंदे भारत: या मार्गावरील संभाव्य थांब्यांमध्ये सातारा, सांगली आणि मिरज या ठिकाणांचा समावेश असेल.
तिकीट दर किती असू शकतो?
या नवीन गाड्यांचे तिकीट दर मार्ग आणि श्रेणीनुसार अंदाजे १५०० ते २००० रुपयांच्या दरम्यान अपेक्षित आहेत. या वंदे भारत गाड्यामध्ये एर्गोनॉमिक सीटिंग, स्वयंचलित दरवाजे, ऑनबोर्ड वाय-फाय (Wi-Fi), आधुनिक स्वच्छतागृहे आणि प्रगत सुरक्षा प्रणाली यांचा समावेश आहे.