अमजद खान
डोंबिवलीतल्या 65 इमारती अनधिकृत असल्याचे नुकतेच समोर आले होते. शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या इमारतींवर हतोडा चालवला जाणार आहे. त्यामुळे जवळपास साडे सहा हजार कुटुंब बेघर होणार आहेत. मात्र या इमारती अनधिकृत आहेत तर त्या उभ्या कशा राहील्या? त्यांना कुणी मदत केली? बिल्डर कोण होते? याबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे डोंबिवलीत राजकीय वरदहस्त असलेली गँग ऑफ डोंबिवली कार्यरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून नुकसान मात्र सर्वसामान्य लोकांचे झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इलेक्ट्रिशन, लेबर, प्लंबर हे त्या 65 इमारतीचे बिल्डर असल्याचे आता समोर येत आहे. सर्व सामान्यांची फसवणूक करणारी गँग ऑफ डोंबिवलीला यासाठी कार्यरत असल्याचा आता आरोप होत आहे. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. त्यामध्ये सामील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. मात्र ज्यांची फसवणूक झाली आहे. त्या गरीब रहिवाशांच्या विरोधात कारवाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होऊ देणार नाही, अशी भूमिका जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.दीपेश म्हात्रे यांच्या आरोपानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये महारेरा घोटाळा उघड झाला आहे. त्यानुसार 65 इमारतीमधील सदनिका रहिवाशांना विकल्या गेल्या. त्या सर्व इमारती अनधिकृत आहेत. केडीएमसी, महारेरा, रजिस्ट्रेशनसाठी लागणारे कागदपत्रे खोटी तयार करण्यात आली होती. या इमारतीवर हातोडा चालविला जाणार या संदर्भातील निकाल काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर साडे सहा हजार कुटुंबे बेघर होऊन रस्त्यावर येणार आहे. रहिवासियांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?
याबाबत शिवसेना उद्धव बाळासोबह ठाकरे पक्षाने जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, वैशाली दरेकर यांच्यासह संबंधित रहिवाशांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दीपेश म्हात्रे यांनी काही गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रकरणात केडीएमसी, महारेराची दिशाभूल झाली. चुकीच्या पद्धतीने घरांचे रजिस्ट्रेशन झाले. याकरीता जबाबदार कोण? थातुरमातूर कारवाई केली. खऱ्या बिल्डरांचा पत्ता नाही. हा सर्व प्रकार डोंबिवलीतील एका गँगने केला आहे. या गँगला राजकीय वरदहस्त आहे असा आरोप त्यांनी केला. या इमारतीमधील नागरीकांना आम्ही बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.
लवकर केडीएमसी आयुक्तांना या प्रकरणी जाब विचारणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षाच्यावतीने जिथे संघर्षाची गरज आहे तिथे संघर्ष करणार. जिथे न्यायालयीन लढाईची गरज आहे, तिथे न्यायालयीन लढा देणार असं ही त्यांनी सांगितलं. निवडणूकीत तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन देणारे आमदार आता कुठे आहेत? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्यामागे राजकीय नेते असल्याचा आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.