योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील ३४ वर्षीय अविवाहित तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट पत्र लिहून लग्नासाठी मदतीची विनंती केली आहे. “मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही,” अशा भावनिक शब्दांत त्या तरुणाने आपली विनंती व्यक्त केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना त्याने सांगितले की, “मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून माझे वय ३४ वर्षे पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस वय वाढत असून भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, ही भीती मनात घर करून बसली आहे.”
कोणत्याही समाजातील मुलगी चालेल — तरुणाची भूमिका स्पष्ट
त्या तरुणाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, “माझ्या जीवनाचा विचार करून मला नविन साथीदार मिळवून द्यावा. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे.” एवढेच नव्हे, तर त्याने म्हटले आहे की, “मुलीच्या माहेरी जाऊन राहण्यास आणि तिथे चांगल्या तऱ्हेने काम करण्यास मी तयार आहे. संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेने करून पुढील आयुष्य गुण्या-गोविंदाने जगू इच्छितो.” त्याच्या या भावनिक शब्दांमधून एकटेपणात जगणाऱ्या माणसाची वेदना आणि आयुष्याला नवा अर्थ मिळवण्याची आस स्पष्टपणे दिसून येते.
अकोल्यात चर्चेत भावनिक अर्ज, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
या अनोख्या पत्रामुळे अकोल्यात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याला असा अर्ज लिहिण्याचे धाडस दाखवणाऱ्या या तरुणाच्या भावनेचे अनेकांनी कौतुक केले आहे. पत्राच्या शेवटी त्या तरुणाने लिहिले आहे, “माझ्या अर्जाकडे सहानुभूतीपूर्वक पाहून मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळवून द्यावी. मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही.”
या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे आणि धैर्याचे कौतुक केले असून, काहींनी हे आजच्या समाजातील विवाहव्यवस्थेवरील ताण आणि बदलत्या वास्तवाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. अकोल्यातील हा तरुण आता चर्चेचा विषय ठरला असून, त्याचे हे भावनिक पत्र व्हायरल होत आहे.