Samruddhi Mahamarg: पंक्चर कार टेम्पोची धडक, दोघांचा मृ्त्यू; मदतीला आलेल्या शेतकऱ्यावरही काळाचा घाला

छत्रपती संभाजीनगरकडून अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर आणि त्यांना मदत करण्यासाठी आलेले शेतकरी देविदास नाना मते हे दोघेही जागीच ठार झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg:  समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जयपूर शिवारात कारचे टायर पंक्चर झाल्यामुळे महामार्गाच्या कडेला थांबलेल्या दोन व्यक्तींना भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. मृतांमध्ये कारला धक्का मारण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याचाही समावेश आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?

योगेश दत्तात्रय घाटेकर हे आपल्या कारमधून रेशीम विक्रीसाठी निफाडहून जालना येथे समृद्धी महामार्गाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, जयपूर शिवारात त्यांच्या कारचे टायर अचानक पंक्चर झाले. त्यामुळे त्यांनी कार महामार्गाच्या बाजूला उभी केली. ज्या ठिकाणी त्यांनी गाडी उभी केली होती, त्याच्या मार्गालगतच्या शेतात देविदास नाना मते नावाचे स्थानिक शेतकरी काम करत होते. घाटेकर यांना कार दुरुस्त करताना पाहून, मदतीच्या भावनेतून देविदास मते त्वरित त्यांच्या मदतीला धावले.

(नक्की वाचा- Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीझ बेंन्ज'ने समृद्धी महामार्ग का घेतला दत्तक? वाचा सविस्तर)

योगेश घाटेकर, बाळू विश्वनाथ घाटेकर आणि शेतकरी देविदास मते हे तिघे कारच्या बाजूला उभे असतानाच, छत्रपती संभाजीनगरकडून अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर आणि त्यांना मदत करण्यासाठी आलेले शेतकरी देविदास नाना मते हे दोघेही जागीच ठार झाले.

कारमध्ये सोबत असलेले बाळू विश्वनाथ घाटेकर हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अज्ञात आयशर चालकाचा शोध सुरू आहे.

Advertisement