मुंबई मराठी माणसांच्या हक्काच्या घरांसाठी शिवसेना ठाकरे गट देखील पुढे सरसावला आहे. 'मुंबईत मराठी माणसाला घरासाठी आरक्षण द्या', विलेपोर्ले येथील पंचम संस्थेच्या मागणीला आदित्य ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तसेच मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्यात देखील मराठी माणसांच्या घरांसाठीचा मुद्दा आहे.
मुंबईत मराठी माणसांना घरासाठी आरक्षण मिळावं या मागणीबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, भाजपचं सरकार असलेल्या राज्यांत हे सगळं का सुरु आहे?, सगळ्यांनी याबाबत विचार करणे गरजेचं आहे. मराठी उद्योगधंदे नाकारले जातात, घर नाकारले जाते, सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जातो. अशा परिस्थितीत एक संस्था अशी मागणी करत असेल तर त्यात अयोग्य काय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात काय?
मराठी माणसांसाठी लढा देण्याचं आश्वासन ठाकरे गटाने पदवीधर निवडणुकीच्या वचननाम्यात देण्यात आलं आहे. विशेषत: मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला आपल्या हक्काची घरे मिळावी या उद्देशाने अशासकीय विधेयक सादर करणार. तसेच मराठी माणसांसाठी गृहनिर्माण धोरण आणि त्यातील आव्हानांसंदर्भात संघर्ष करणार, असं आश्वासन वचननाम्यात देण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- मराठी माणसांना मुंबईत घरांसाठी आरक्षण द्या! मुंबईतील संस्थेची मागणी)
पंचम संस्थेचं म्हणणं काय?
पंचम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी म्हटलं की, मुंबईत मराठी माणसाला घरासाठी आरक्षण द्या, या मागणीला घेऊन या संस्थेमार्फत मुंबईतील सर्व आमदारांना पत्र पाठवण्यात येणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेसाठी घेण्यात यावा अशी मागणी देखील आमच्याकडून करण्यात येणार आहे.
(नक्की वाचा - "ये डर अच्छा है", आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली)
पंचम संस्थेने केलेल्या सूचना?
- जुन्या इमारतींमधील घरे मराठी माणसांना विकण्यासाठी अमराठी लोक तयार होत नाहीत. दुसरीकडे मोठ्या घरांचा देखभाल खर्च (मेंन्टेनन्स) मराठी माणसाला परवडत नाही. अशा अनेक समस्यांमुळे मुंबईतील मराठी टक्का घसरत आहे.
- अमराठी सोसायट्यांमघ्ये अरेरावी व कोणतीही गोष्ट आर्थिक ताकदीवर झुकवण्याच्या वृत्तीने मराठी माणसांच्या तिथे घर घेता येत नाही. त्यामुळे नव्या इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एका वर्षांपर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे 50 टक्के आरक्षण ठेवावे.
- वर्षभरात या घरांची मराठी माणसांकडून खरेदी न झाल्यास बिल्डर ते कुणालाही विकू शकतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या मराठी माणसाचं मुंबई घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, अशी सूचना पंचम संस्थेने केली आहे.