सुनिल दवंगे, अहिल्यानगर
अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग समोर आला आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली.
चार वर्षाचा कुणाल अजय आहेर हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला. त्याच वेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले.
नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर तत्काळ उसाच्या शेतात धावले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नातवाला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. जखमी कुणाल याची अनेकांनी भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील रुग्णालयात जात जखमी बालक व त्याच्या कुटुबीयांची भेट घेतली.
दरम्यान परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे. सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला असून वन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्यावी, अशीच मागणी आता समोर येत आहे. दरम्यान नातवाच्या जीवासाठी बिबट्याशी भिडणाऱ्या आजोबांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.