Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथील निवासस्थानी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. पुणे जिल्ह्यातील काटेवाडी तसेच आसपासच्या गावांतील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. यावेळी "अजित दादा अमर रहें","अजित दादा परत या" अशा घोषणा दिल्या जात होत्या. अजित पवार यांच्या निधनामुळे भावुक झालेल्या नागरिकांनी पुणे जिल्ह्याच्या विकासातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत म्हटलं की, "त्यांच्यासारखा नेता पुन्हा जन्माला येणार नाही."
विमान अपघातात अजित पवार यांचे निधन
पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामती विमानतळाजवळ लियरजेट विमान बुधवारी (28 जानेवारी) सकाळी कोसळले. या अपघातात अजित पवार (वय 66) यांचे निधन झाले. भीषण अपघातात अजित पवारांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
समर्थकांना अश्रू आवरेना
गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रुग्णालयातून त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळेसे शेकडो लोकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. अजित पवारांबाबत भावना व्यक्त करताना काटेवाडीतील 65 वर्षीय रहिवासी गणपत थोंब्रे यांचा कंठ दाटून आला आणि अश्रूंचा बांध फुटला.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: मित्रांनो माझा देव चोरला आज, अजित पवारांसाठी बिग बॉस फेम सुरज चव्हाणची भावुक पोस्ट)
थोंब्रे यांनी सांगितले की, आमच्याकडून आमचे नेते हिरावून घेणाऱ्या त्या दुर्दैवी घटनेला आता 24 तास उलटून गेले आहेत. दादा आता आपल्यात नाही, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही, त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. थोंब्रे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री असूनही त्यांनी काटेवाडी, खटलपट्टा, सोनगाव आणि आसपासच्या इतर गावांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले."
(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवार विमान प्रवासात प्रचंड घाबरले होते, देवाच्या नावाचा करू लागले होते जप, पाहा VIDEO)
थोंब्रे पुढे असंही म्हणाले की, ते पवार यांना वैयक्तिकरित्या ओळखत होते, कारण त्यांच्या नातीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी पवार यांनी मदत केली होती. चांगले रस्ते आणि शाळा उभारून त्यांनी या परिसराचा कायापालट केला. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, असंही थोंब्रे म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातून आलेले चंद्रकांत माळी यांनी म्हटलं की, महाराष्ट्रने एक हीरा गमावलाय. दरम्यान अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील राजकारण्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
(Content Source PTI)