- प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar Jayanti 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि दादांचे निकटवर्तीय मानले जाणारे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी NDTV मराठीला दिलेल्या Exclusive मुलाखतीत भावुक आठवणींसह अनेक धक्कादायक दावे केले आहेत. अजितदादांच्या निधनाचा धक्का आजही सहन होत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. "विमान सरळ जात असताना अचानक तिरपे होऊन कोसळते, ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचा घाबरलेला आवाज ऐकू येतो, मग नेमकं काय घडलं? याची पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे," अशी ठाम मागणी त्यांनी केली.
कोकाटे यांनी अजितदादांची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराजांशी करत "कर्तृत्ववान माणूस कट-कारस्थानातून समाजापासून हिरावला गेला, तशीच काहीशी घटना दादांसोबत घडली," असे विधान केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुलाखतीदरम्यान कोकाटे अनेकदा भावुक झाले. "आम्ही अजूनही दादांच्या दुःखातून बाहेर पडलेलो नाही. सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय दादा यांनाही हा धक्का पचलेला नाही. आम्ही आजही कोणत्याही बॅनरवर त्यांच्या नावापुढे 'स्वर्गीय' हा शब्द लावत नाही," असे सांगताना त्यांनी दादांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
"अजित दादांनी दिलेला शब्द पाळला"
अजित दादा शब्दाचे पक्के होते.. विधानसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी दादा आले होते तेव्हा सभेत एक कार्यकर्ता ओरडला होता की कोकाटे चार वेळा आमदार झाले त्यामुळे कोकाटे यांना मंत्री करा म्हणून दादांनी सभेत सांगितले होते की तुम्ही निवडून आणा बाकी मी बघतो म्हणून आणि त्यानंतर मी निवडून येताच दादांनी दिलेला शब्द पाळत मला मंत्री केले होते. मी मंत्री झाल्यावर मला दादांनी सांगितलं होतं की मीडियापासून जरा दूर राहा आणि फार लोकांना अंगावर घेऊ नको, सामान्य लोकांसाठी दिवस रात्र काम कर", असा मला नेहमी दादा संदेश द्यायचे.
"दादा मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. प्रशासनावर त्यांचा जबरदस्त वचक होता आणि सामान्य माणसाला आधार मिळाला असता," असेही ते म्हणाले.
(नक्की वाचा: Ajit Pawar Jayanti 2026: सगळं पोरकं झालंय...अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट)
"पार्थ पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय"
पार्थ पवारांबाबतही कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. "पार्थ पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. ते तरुण आहेत म्हणून त्यांची टिंगल केली जाते. पण त्यांना मंत्रिपद दिलंच पाहिजे. त्यांना अधिकार आणि जबाबदारी दिली तर ते अजितदादांचा वारसा समर्थपणे पुढे नेतील," अशी मागणी त्यांनी केली. स्वतःच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना कोकाटे म्हणाले, "माझ्यापेक्षा माझ्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं दुःख अजितदादांना जास्त झालं होतं, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यांनी मला 'मी तुझ्यासोबत आहे' असा आधार दिला होता. माझ्याविरोधात अनावश्यक षडयंत्र रचण्यात आलं, पण दादांनी शेवटपर्यंत साथ सोडली नाही."
पक्षातील नाराजी आणि फुटीच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. "आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. कोणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर तो नतदृष्ट ठरेल. दादांच्या नावावर हा पक्ष उभा आहे. दादांच्या कुटुंबीयांना सोडून जाणाऱ्यांना जनता कधीच स्वीकारणार नाही.. दादांनी जे यांना नेतृत्व दिलं ते त्यांना आयुष्यात कुठेही दुसऱ्या पक्षात मिळणार नाही",असा इशाराही त्यांनी दिला.
कोकाटेंच्या या मुलाखतीतून अजितदादांप्रती असलेलं त्यांचं भावनिक नातं, विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय, पार्थ पवारांना मंत्री करण्याची उघड मागणी आणि पक्षातील घडामोडींवर केलेली स्पष्ट वक्तव्ये यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.