Pune Integrated Double Decker Bridge inaugurated : पुणेकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. पुण्यातील सर्वात गर्दीच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली पुलाचं लोकार्पण आज पार पडलं.
लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, अजित पवार या पुलासाठी आग्रही होते. यासाठी विविध टप्प्यावर अजित दादांनी काम केलं होतं. दादांनी सर्वांना विश्वासात घेऊन विविध पक्षांचे नेते एकत्र आले आणि पुलाचं काम पूर्ण झालं. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पुलाचं लोकार्पण झालं असून या पुलाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशी मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीला मान्यता दिली असून लवकरच हा पुल अजित पवारांच्या नावाने ओळखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडणारा एकात्मिक दुमजली पूल (What is an integrated double-decker bridge?)
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकात हा दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावरुन मेट्रो धावणार आहे. वर मेट्रो आणि खाली उड्डाणपूल अशी या प्रकल्पाची बांधणी असून याला एका खांब्याचा आधार दिला जातो, त्यामुळे याला एकात्मिक दुमजली पूल म्हटलं जातं. मेट्रो आणि उड्डाणपूल एकत्रित असल्याने सिग्नलवरील ताण कमी होईल. येथील प्रवास सुकर आणि जलद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुणाला फायदा?
या एकात्मिक दुमजली पुलामुळे बाणेर, पाणार आणि विद्यापीठ परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.