योगेशे शिरसाट, प्रतिनिधी
UPSC Ranks In India : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे राहणाऱ्या तरुणीने या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. रेणुका दिनेश केकन असं या तरुणीचं नाव आहे. पातुरची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणीनं पातूर तालुक्याच्या इतिहासात सोनेरी पानं जोडली गेली आहेत. यूपीएससी परीक्षा पास होणारी ती तालुक्यातील पहिली मुलगी ठरली आहे. ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या परीक्षेत यश मिळवल्यामुळे पातूर शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वांना या तरुणीचा अभिमान वाटत आहे. तसच गावोगावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रेणुकाचं हे यश केवळ तिच्या कुटुंबापुरतं मर्यादित राहिलेलं नाही,तर संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.ग्रामीण भागातील मुलीदेखील मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात.हे रेणुकानं आपल्या मेहनतीनं दाखवून दिलं आहे.त्यामुळे पातूरसह आसपासच्या गावांमधील विद्यार्थ्यांमध्येही नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.अनेक जण तिच्या घरी जाऊन तिचं अभिनंदन करत आहेत.या यशामुळे पातूर तालुक्याचं नाव राज्यभर झळकलं आहे.गावाकडच्या साध्या घरातून निघालेली ही मुलगी आज आयएएस बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. पातूरसारख्या ग्रामीण भागातून इतकं मोठं यश मिळाल्यानं तालुक्यात आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.
नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात खळबळ! 'या' कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, नेमकं कारण काय?
साध्या कुटुंबातून घडली कर्तबगार मुलगी
रेणुका केकन ही पातूरची रहिवासी असून तिचे वडील दिनेश केकन हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. तर आई शोभा केकन या गृहिणी आहेत. यादरम्यान,साध्या आणि शैक्षणिक वातावरण असलेल्या कुटुंबात वाढलेल्या रेणुकानं लहानपणापासूनच अभ्यासात चांगली कामगिरी केली. तिचं प्राथमिक शिक्षण पातूर येथील जिल्हा परिषद शाळा,आरिफ नगर इथं झालं. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण तुळसाबाई कावल विद्यालयात येथे पूर्ण केलं.
बारावीच्या परीक्षेत रेणुकानं उत्कृष्ट गुण मिळवत आपल्या विभागात पहिला क्रमांक मिळवला होता. पुढे उच्च शिक्षणासाठी तिनं पुणे येथील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. कला शाखेतून पदवी शिक्षण घेत असताना तिनं तिथंही उत्तम कामगिरी करत कॉलेजमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तिच्या अभ्यासातील सातत्य आणि मेहनत तेव्हाच दिसून आली होती.घरात आई-वडील शिक्षणाला नेहमी प्रोत्साहन देणारे असल्यामुळे रेणुकाला अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळालं.तिच्या कुटुंबात एक लहान बहीण देखील आहे.साध्या परिस्थितीतून पुढे जात तिनं मोठं यश मिळवल्यामुळे आज तिच्या कुटुंबाचा अभिमान अधिक वाढला आहे.
नक्की वाचा >> पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीनं केलं भयंकर कृत्य, अख्ख कुटुंब हादरलं! वादाचं कारण वाचून धक्काच बसेल
कोणताही क्लास न लावता UPSC परीक्षा पास झाली
UPSC परीक्षा पास होण्याचा निर्धार करून रेणुकानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे तिनं कोणताही खासगी क्लास न लावता स्वतःच्या अभ्यासावर आणि ऑनलाइन माध्यमांच्या मदतीनं तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिनं तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत मोठं यश मिळवलं. लहानपणापासून समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची इच्छा तिच्या मनात होती. शालेय जीवनातच प्रशासनातील कामकाजाबद्दल तिच्या मनात आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून तिनं स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला आणि आता त्या स्वप्नाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे.
आजकाल UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो. बहुतांश विद्यार्थी विज्ञान किंवा इंजिनिअरिंगचा मार्ग निवडतात, पण पातूरसारख्या ग्रामीण भागातून कला शाखेतून पदवी शिक्षण घेत रेणुका केकन हिनं UPSC पास करून वेगळं उदाहरण घालून दिलं आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास मोठं यश मिळू शकतं, हे तिनं आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती आज प्रेरणादायी ठरली आहे.