आळंदीच्या बाबूरावची 'स्टाईल' तरुणांसाठी प्रेरणादायी, अवघ्या 6 वर्षात  शून्यातून निर्माण केलं विश्व

Success Story : सहा वर्षांपूर्वी घरदार सोडून बाबूराव बीडच्या छोट्याशा गावातून आळंदीत आला होता. घरात भांडण करून 2018 साली रागाच्या भरात तो आळंदीत आला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

अविनाश पवार, आळंदी

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीमत्वांच्या अनेक प्रेरणादायी कथा तुम्ही ऐकल्या असतील. आळंदीतील एका  23 वर्षीय तरुणाचा प्रवास देखील अनेकांना प्रेरणादायी ठरु शकतो. नोकरी नाही म्हणून खचलेल्या-भरकटलेल्या तरुणांना या तरुणाचा प्रवास मार्ग दाखवेल. बाबूराव काळे असं या तरुणाचं नाव आहे. 

सहा वर्षांपूर्वी घरदार सोडून बाबूराव बीडच्या छोट्याशा गावातून आळंदीत आला होता. घरात भांडण करून 2018 साली रागाच्या भरात तो आळंदीत आला होता. रागात आपण इथे आलो खरं पण जगण्यासाठी करायचं काय? असा प्रश्न बाबूराव समोर होता. काही दिवस सोबत आणलेल्या पैशातून त्याला दोन वेळचं जेवण मिळत होतं. जागा मिळेल तिकडे रात्रीच्या वेळी झोपत होता. मात्र इथे राहायचं असेल तर हातात पैसा लागेल याची जाणीव बाबूरावला झाली. 

त्यासाठी कामाच्या शोधात बाबूरावने पायपीट केली. मात्र लॉकडाऊन असल्याने त्याच्या हाताला काम मिळत नव्हतं. कसंबसं एका गादीच्या दुकानात त्याने काम मिळवलं. मात्र दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये हे कामही सुटलं. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काय काम करायचं असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यावेळी आळंदीत येणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचं त्याने ठरवलं. तिथल्याच एका काकांनी त्याला यासाठी मदत केला. 

भविकांना गंध-बुक्का लावण्याचं काम सुरु केल्यानंतर बाबूरावने मागे कधी वळून पाहिलं नाही. भाविकांना गंध-बुक्का लावून त्याने थोडे पैसे कमावले. कमावलेल्या पैशातून एक हातगाडी घेतली. त्यावर कधी भाजी, भूईमुगाच्या शेंगा तर कधी मक्याचे कणीस विकून थोडेफार पैसे कमावले. मात्र बाबूरावला यात फार रमायचं नव्हतं. काहीतरी वेगळं करुन स्वत:ला सिद्ध करायचं होतं.

Advertisement

त्यासाठी त्याने एक कॅमेरा विकत घेतला आणि फोटोशूट करु लागला. आळंदीतच त्याने छोटा फोटो स्टुडियो सुरु केला. त्याच्या या व्यवसायाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता बाबूरावने लग्न जमवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. आळंदीत जे लग्न करण्यासाठी येतात त्याचं लग्न लावून देणे, मॅरेज रेजिस्ट्रेशन असा व्यवसाय सुरु केला. आता बाबूरावचा हा व्यवसाय दिवसेदिवस वाढत आहे. त्यातून होणारी कमाई देखील मोठी आहे. त्यात तो समाधानी आहे.  

बाबूराव काळे किती पैसे कमावतो?

बाबूराव या व्यवसायातून किती पैसे कमावतो हे सांगता येणार नाही. पण त्याच्या सध्यस्थितीवर याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. बाबूरावने आपल्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आळंदीत जागा घेतली आहे. गावी शेती घेतली, दोन-अडीच लाखांचा कॅमेरा विकत घेतला. बाबूरावला कुठलंही पाठबळ नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचला. बाबूराव घरापासून दूर एकटाच असताना हाती पैसै असताना वाईट मार्गाला लागू शकत होता. मात्र आपल्या विचारांशी ठाम राहून त्याने पै पै जमवून आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग निवडला. बाबूरावच्या या 6 वर्षांच्या प्रवासातून अनेकांना उर्जा मिळेल हे नक्की.

Advertisement
Topics mentioned in this article