सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात 50 वर्षीय अमेरिकन महिला लोखंडी साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. रुग्णालयात महिलेने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिठ्ठीतील माहितीनुसार, महिलेने दावा केला आहे की तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने तिला येथून सुमारे 450 किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधले आणि नंतर तो स्वतःहून निघून गेले. शनिवारी (27 जुलै) सायंकाळी महिलेचा आरडाओरडा ऐकून एक मेंढपाळ तेथे पोहोचला. महिलेला साखळदंडात पाहून त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तपासणी केली त्यावेळी महिलेकडून एक आधार कार्ड सापडले, ज्यावर तामिळनाडूचा पत्ता होता. तिच्याकडे अमेरिकन पासपोर्टची झेरॉक्सही सापडली आहे. ललिता काई असे तिचे नाव आहे. तिच्या व्हिसाची मुदत संपली होती आणि ती गेल्या 10 वर्षांपासून भारतात राहत होती, असे पोलिसांनी सांगितले.
(नक्की वाचा- Pooja Khedkar Case : 'धो' चा 'को' केला; पूजा खेडकरांच्या कुटुंबीयांचा आणखी कारनामा उघड)
महिलेला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले. तिच्याकडून उपचाराच्या काही प्रिस्क्रिप्शन स्लिपही पोलिसांना सापडल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत सांगितलं की, रुग्णालयात महिलेने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे, तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य आणि चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलेचा जबाब अद्याप अधिकृतपणे नोंदवले गेलेले नाही, परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
(नक्की वाचा- राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार? जितेंद्र आव्हाड नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत )
अमेरिकन दुतावासाकडून घटनेची दखल
अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केली आहे. त्यानुसार पोलिसांनी महत्वाचा पुरावा ठरणारे मडुरा रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ती कुठेही आढळून न आल्याने प्रकरणात गूढ वाढले आहे. जर तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले? याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर याच स्थानकातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याचे समजते. तिच्यासोबत असलेल्या मोबाईलवरून तिने कोणाशी संपर्क केला? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.