![Pooja Khedkar Case : 'धो' चा 'को' केला; पूजा खेडकरांच्या कुटुंबीयांचा आणखी कारनामा उघड Pooja Khedkar Case : 'धो' चा 'को' केला; पूजा खेडकरांच्या कुटुंबीयांचा आणखी कारनामा उघड](https://c.ndtvimg.com/2024-07/qnr27hio_pooja-khedkar_625x300_12_July_24.jpeg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
देवा राखुंडे, बारामती
ट्रेनी IAS पूजा खेडकर प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकतोय तसे अनेक खुलासे समोर येत आहे. आता खेडकर कुटुंबियांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सात-बारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा नावात बदल केला आहे.
दिलीप धोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सातबारा देखील उपलब्ध आहे. वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली होती. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी या जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
अपंगत्वाच्या दाखल्याबाबतचा अहवाल आज सादर केला जाणार
पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडून मिळवलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याबाबत खुलासा वजा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे आज महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना त्यांनी तयार केलेला चौकशी अहवाल सादर करतील. पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला मिळवला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world