मोसिन शेख, प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवशेषांची तस्करी करून त्याचा वापर जादूटोणा, अंधश्रद्धेसाठी केला जातो, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम आणि राहुल वडमारे यांनी हा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांना निवेदन देत विविध मागण्या केल्या आहेत. संग्रहालयात असलेल्या घुबड या पक्षाच्या अवशेषांमधील नखे, पिसे व अवयव काढून घेण्यात आल्याची गंभीर बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. पुरोगामी विद्यापीठात अंधश्रद्धा व तस्करी खपवून घेणार नाही, असा आंदोलनाचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवाची तस्करी होत असल्याचा आरोप आहे. विद्यापीठातील म्युझियममध्ये ठेवलेल्या घुबडसह अनेक पक्षांची नखे, जादूटोणासाठी वापरली जातात,असाही आरोप आहे. निवदेनात म्हटलंय की, प्राणिशास्त्र विभागात विविध प्राणी, पक्षी यांचे अवशेष, हाडे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जतन करून ठेवण्यात आली आहेत. पण यातील काही प्राणी पक्षींच्या अवयवांची तस्करी करून ते काळ्या बाजारात विकले जातात. त्याचा गैरवापर जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेसाठी केला जाऊ शकतो. या वस्तुसंग्रहालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडणार? जमिनीच्या मोजणीला 'या' गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, कारण काय?
विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयातील बहुतांश कपाटांना टाळे नाही
तसेच वस्तुसंग्रहालयातील बहुतांश कपाटांना टाळे नाही. त्याठिकाणी पुरेशी स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था नाही. घुबड पक्षाची नखे, पिसे हे अवयव गायब झाली आहेत. ही फक्त चोरीच नसून वन्यजीव तस्करी, काळा बाजार, अंधश्रद्धा-आधारित जादूटोणा यांसारख्या घृणास्पद आणि गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित प्रकार आहे. विद्यापीठासारख्या शैक्षणिक आणि पुरोगामी संस्थेत, असा प्रकार घडणे हे अत्यंत अशोभनीय, लाजिरवाणी बाब आहे. या प्रकाराची दखल घेत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुणे महापालिकेत खळबळ! अधिकाऱ्यांसमोर एकाने डोक्याला पिस्तुल लावलं...पुढे काय घडलं?
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्य मागण्या काय?
- या घटनेची तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
- वस्तुसंग्रहालयातील सर्व जतन नमुन्यांची पूर्ण पडताळणी (Inventory Audit) करून अहवाल जाहीर करावा.
- सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंदी, सुरक्षा कर्मचारी, विभागातील जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- ही घटना वन्यजीव तस्करी किंवा चोरी या स्वरूपाची असल्याने, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करावा.
- भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी वस्तुसंग्रहालयात सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, डिजिटल रेकॉर्ड, लॉक-सील व्यवस्था अधिक मजबूत करावी.