जाहिरात

Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडणार? जमिनीच्या मोजणीला 'या' गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, कारण काय?

पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी पारगाव मेमाने या ठिकाणी विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी सुरु केली. पण नंतर मोठा राडा झाला.

Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडणार? जमिनीच्या मोजणीला 'या' गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, कारण काय?
Purandar Airport Latest News Update
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Purandar Airport Latest Update : पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी पारगाव मेमाने या ठिकाणी विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी सुरु केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या मोजणीला प्रचंड विरोध दर्शवला. त्यानंतर स्थानिक नागरिक, वनविभागाचे अधिकारी,सासवडचे तहसीलदार आणि अधिकाऱ्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली. पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. यासाठी शासनाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी या विमानतळाच्या कामाला पाठिंबा दर्शवला आहे. पण काही शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम आहे.

या प्रकल्पाचा फटका सात गावांना बसणार आहे. यापैकी पारगाव मेमाणे आणि उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी देण्यास विरोध दर्शवला आहे. हा विरोध कायम असून आज पारगाव मेमाने आणि उदाचीवाडी या दोन गावात ड्रोनद्वारे शासकीय पद्धतीने जमिनीचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु, या प्रक्रियेला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे, त्यांच्या जमिनीची शासनाने मोजणी करावी, याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही. पण ज्यांनी सहमती दर्शवलेली नाही, अशांच्या जमिनी शासनाने मोजायच्या नाहीत. आमच्या शेतात यायचं नाही, अशी ठाम भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

नक्की वाचा >> Pune News : आयटी पार्क हिंजवाडीत ट्रॅफिक जॅम अन्...मेट्रो स्टेशन परिसरात दुर्देवी घटना, नेमकं काय घडलं?

"पारगाव आणि उदाचीवाडी गावात आज सकाळी सकाळी शासकीय अधिकारी जमीन मोजणीसाठी आले. या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांना याबाबत सांगण्यात आलं नव्हतं. त्यांनी जबरदस्तीने जमिनी मोजमाप करून घेतल्या. शासनाचे लोक आम्हाला सांगत होते की आम्ही वनविभागाची जमीन मोजली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे पुरावा मागितला, मात्र त्यांनी तो दिला नाही. त्यांना वनविभागाची जमीन मोजायची आहे, तर मग आमच्या शेतामध्ये दोन किलोमीटर पुढे ड्रोन कशासाठी जातो", असा थेट सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

"विमानतळाच्या निर्मितीसाठी आम्हाला जमीन द्यायची नाही. त्यामुळे आमच्या जमिनीची मोजणी करू नका. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजलाम सुफलाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहात", असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही विमानतळ निर्मितीसाठी जर आमच्या जमिनी दिल्या तर आम्ही पुढे काय खायचं आणि कुठे जायचं?" असा प्रश्न या संतप्त नागरिकांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> अमेरिकेत गेलेल्या IIT ग्रॅज्युएटला आला वेगळाच अनुभव, भारतीयांनी USA ला जावं की नाही? पोस्ट वाचून तुम्हीच ठरवा

आम्ही अद्यापही आमच्या जमिनीची विमानतळ निर्मितीसाठी सहमती दर्शवलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून जमिनीची मोजणी करू नका, असं उदाचीवाडी आणि पारगाव मेमाने गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतीवाडी करून आम्ही आमचा कुटुंब चालवत आहोत. मात्र आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणच्या मोजणीसह इतर गोष्टी केल्या जात आहेत. ते आम्हाला मान्य नाहीत असंही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com