मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज 5 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर अंजली दमानिया यांनी बीडमधील अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून वंजारी समाजातील नागरिकांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडमधील पोलिसांच्या उच्चपदस्थ ठिकाणी अधिकांश अधिकारी वंजारी समाजाचे आहेत. दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत एक यादी शेअर करीत तपासाची मागणी केली होती. यानंतर दमानिया यांना धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरदिवशी तब्बल 700 ते 800 कॉल येत असून अत्यंत अश्लील प्रकारच्या कमेंट केल्या जात असल्याचं दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
नरेंद्र सांगळे नावाच्या एका व्यक्तीने अंजली दमानिया यांचा फोन सोशल मीडियावर शेअर केला आणि सतत फोन करण्याचं आवाहन दिलं. त्यानंतर अंजली दमानिया यांना एका दिवसात 700 ते 800 फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुनील फड, नरेंद्र सांगळे हे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असून त्यांच्याकडून मला धमकीचे फोन येत असून माझ्याविरोधात अत्यंत अश्लिल आणि अर्वाच्च भाषेचा वापर केल्याचं दमानिया यांनी सांगितलं. मला धमकी देणाऱ्या आणि समाज माध्यमांवर माझा फोन नंबर शेअर करून अर्वाच्च-अश्लील भाषेचा वापर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Beed News : SIT पथकातही वाल्मिक कराडचे चाहते? संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट
SIT बरखास्त करा..
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीने स्थापन केलेल्या एसआयटीवर अंजली दमानिया यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या एसआयटीमध्ये बीडच्याच अधिकाऱ्यांचा समावेश असून यातील दोन अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्ष तपास कसा होईल, त्यामुळे ही एसआयटी तातडीने बरखास्त करावी आणि दुसऱ्या जिल्ह्याबाहेरील किंवा गरज लागली तर दुसऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.