छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील "सोनेरी पान" आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याने हा ठेवा जपण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुरातन वारसा जतन-संवर्धन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुनगुंटीवार यांनी समितीच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत लढणारे मावळे आणि सरदार शूर वीर आणि धैर्यवान होते. रयतेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या सरदारांशी संबंधित पुराभिलेख, दस्तऐवज, त्यांनी युद्धकाळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, त्यांच्या निवासाचे वाडे शूरतेचा, वीरतेचा व समृद्धीचा वारसा सांगणारे आहेत.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
ज्यांनी आपल्यासाठी प्राण त्यागले त्यांच्यासाठी आपण वेळ खर्च करून येणाऱ्या पिढीला सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे, असे यावेळी मुनगंटीवार म्हणाले. या पुरातन बाबींचे विभागाच्या माध्यमातून जतन केले जावे व महाराष्ट्राच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरावे, असे ही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनासाठी राज्यात अद्ययावत संग्रहालय उभारण्याचा विचार असून ते देशातले सर्वोत्तम संग्रहालय ठरेल, अशा पद्धतीने त्याचे दर्जेदार काम उभारवयाचे आहे. राज्यातील शिवकालीन वस्तू, सरदारांचे वाडे तसेच त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि वस्तू यांची यादी तयार करण्याचे निर्देश देखील मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. या विषयी क्यू आर कोड सह एक माहिती पुस्तिका व बदलत्या काळानुरूप डिजिटल डॉक्युमेंटेशन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.