स्वानंद पाटील
बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे. केज विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. सुंदरराव सोळंके, बाबुराव आडसकर, भागोजी सातपुते, गंगाधर स्वामी, डॉ.विमल मुंदडा यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांचे कार्यक्षेत्र राहिलेला हा मतदार संघ आहे. त्या या मतदारसंघात पाच वेळेला आमदार राहिलेल्या आहेत. त्यांची सुन नमिता मुंदडा या सध्या या मतदार संघाच्या आमदार आहेत. त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. बदलत्या राजकीय स्थितीमुळे ही जागा राखणे हे भाजप समोर मोठे आव्हान असणार आहे. त्यात मराठवाड्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. याचा फटका कोणाला बसतो हेही महत्वाचे आहे. शिवाय मनोज जरांगे फॅक्टर किती काम करतो यावरही या मतदार संघाचे भवितव्य ठरणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2009 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमल मुंदडा येथे आमदार होत्या. 2012 साली डॉ. विमल मुंदडा यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे यांची आमदार म्हणून वर्णी लागली. 2014 ला संगीता ठोंबरे या भाजपकडून आमदार झाल्या.पुढे नमिता मुंदडा यांनी 2019 साली राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपने विद्यमान आमदार संगिती ठोंबरे यांची उमेदवारी कट करत विधानसभेची उमेदवारीही दिली. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभेत निवडणूक लढवून आमदार झाल्या.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा 32,909 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत मुंदडा यांना 1 लाख 23 हजार 433 तर साठे यांना 90 हजार 524 इतके मतदान झाले होते.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
पक्ष फुटीनंतर शरद पवारांसोबत राहणारे पृथ्वीराज साठे यांनी केज मतदार संघातून काम सुरू केले आहे. त्यांनी निवडणुकीसाठी दौरेही सुरू केले आहेत. पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यातच माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी पक्षाच्या विनंतीवरून 2019 सालची विधानसभा निवडणूक लढली नव्हती. मात्र आता यंदाच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे. तशी घोषणा त्यांनी एका पत्रकार परिषदेतही केली आहे.तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची घेतलेली भेट घेतली आहे. ही बाब भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते. भाजपकडून पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. पंकजा मुंडे या याच केज विधानसभा मतदार संघातून पिछाडीवर होत्या. या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांना 1 लाख 23 हजार 158 मतं मिळाली होती. तर पंकजा मुंडे यांना 1 लाख 09 हजार 360 मते मिळाली होती. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जवळपास 14 हजारांची आघाडी होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा कायम ठेवण्याचे आवाहन भाजप समोर असेल. शिवाय बंडखोरी रोखण्याचे कामही भाजपला करावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world