जाहिरात

जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?

महायुतीत भाजप, अजित पवार गट यांच्याकडूनही अनेकांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. तिच स्थिती आघाडीतही आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये इच्छुकांची संख्या पाहाता चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
पुणे:

पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहे. त्यामुळे आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे हे इच्छुक आहेत. असं असलं तरी महायुतीत भाजप, अजित पवार गट यांच्याकडूनही अनेकांनी या मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये इच्छुकांची संख्या पाहाता चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसकडून या मतदार संघात पुन्हा एकदा संजय जगताप यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. संजय जगताप यांनी मतदार संघात आपल्या प्रचाराला सुरूवातही केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना तब्बल 35 हजाराचे मताधिक्य होते. त्यामुळे संजय जगताप यांच्या दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. लोकसभेला  शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती करत शिवतारे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वसन दिले होते. त्यानुसार ते मतदार संघात कामाला लागले आहे. त्यामुळे जगताप विरूद्ध शिवतारे अशी लढत इथे रंगण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री असलेल्या शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पुरंदरचे आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा ते विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत मात्र विजय शिवतारे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी विजय मिळवला.या निवडणुकीत संजय जगताप यांनी 31 हजार 400 मतांनी विजय मिळवला होता.पाच वर्ष मंत्री असूनही विजय शिवतारे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्याता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आघाडीला या मतदार संघातून 35 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे शिवतारे यांच्या समोर हे लिड तोडण्याचे आव्हान असेल. 

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?

काँग्रेसचे संजय जगताप आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे जरी मतदार संघात कामाला लागले असले तरी इथे इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदार संघावर शरद पवार गटानेही आघाडीत दावा केला आहे. तर महायुतीत भाजपला हा मतदार संघ हवा आहे. त्यामुळे इच्छुक आतापासूनच फिल्डींग लावून आहेत. या मतदार संघात पुण्यातील शहरी भाग जोडला आहे. त्यामुळे भाजपला मानणारा मोठा मतदार याभागात आहे. त्यामुळे भाजपने या मतदार संघावर दावा केला आहे.  भाजपचे जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे हे  निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे तयारीला लागले आहेत. त्यामुळे मतदार संघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीत या मतदार संघात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?

पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी जनता दलाचा गड होता. जनता दलाचे दादा जाधवराव यांनी सर्वाधिक वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. पाच वेळा ते या मतदार संघातून विधानसभेवर निवडून  गेले होते. त्या आधी  1962 आणि 1967 या दोन पंचवार्षिक मध्ये काँग्रेसच्या ज्ञानेश्वर खैरे यांनी पुरंदरचे प्रतिनिधीत्व केले होते. 1972 मध्ये समाजवादी पक्षाचे ज्योतीयाजीराव जाधवराव हे आमदार झाले. 1978 साली दादा जाधवराव पुरंदरचे आमदार झाले.1980 साली  झालेल्या निवडणुकीत त्यांचा संभाजीराव कुंजीर यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या 1985,1990,1995,1999,सलग चार निवडणुका दादा जाधवराव यांनी जिंकल्या. मात्र 2004  साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकराव  टेकवडे यांनी त्यांचा पराभव केला आणि यांनी त्यानंतर जाधवराव पर्व संपले.
 

Previous Article
'मला एक खून माफ करा' राज ठाकरेंना कोणाचा करायचाय खून? ऐकून तुम्ही म्हणाल...
जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
ncp-to-field-highest-number-of-candidates-in-mumbai-vidhansabha-elections
Next Article
महायुती मुंबईत वापरणार 'मुस्लीम कार्ड', विधानसभा निवडणुकीत 'या' जागांवर देणार उमेदवार