Kalyan News : कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्यावरील टोपीवरून शेजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीत एका तरुणाने गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथ मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याण मोहने येथील लहूजीनगरच्या मैदनात ही घटना घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार नवाब शेख, अफसर शेख, शब्बीर शेख आणि शाहरुख शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
टोपीवरून वाद
कल्याणजवळ मोहने येथील लहुजीनगर परिसरात राहणाऱ्या बिगर कांबळे यांनी डोक्यावर टोपी घातली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नवाब शेख नावाच्या तरुणाने ही टोपी कांबळे यांच्या डोक्यावरून काढून स्वतःकडे घेतली. मोनू फुलोरी नावाच्या व्यक्तीने ही टोपी नवाब शेख यांच्या डोक्यातून काढली आणि परत बिगरला दिली. यावरून नवाब शेख संतापला.
गर्भवती महिलेवर हल्ला
यावरून नवाब शेख आणि त्याचे तीन नातेवाईकांनी मोनू फुलोरीला मारहाण करायला सुरुवात केली. मध्यस्थी करायला मोनू याची मावशी वैशाली भालेराव ही आली. नवाब आणि त्याचे नातेवाईक यांच्या हातात हॉकी स्टिक आणि दांडके होते. त्यांनी गरोदर असलेल्या वैशाली भालेराव यांच्यावरही हल्ला केला.
(नक्की वाचा- PWD च्या 111 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; भिवंडी कोर्टाच्या निकालाने आरोपी आणखी अडचणीत)
यावेळी नवाब शेखने वैशाली यांच्या पोटात जोरात लाथ मारली. यात वैशाली यांच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वैशाली भालेराव यांच्यावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी नवाब शेख, अफसर शेख, शब्बीर शेख आणि शाहरुख शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.