- आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील विविध पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रम करत आहेत
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने विठ्ठलनामाच्या गजरात कलाकारांची दिंडी निघाली
- दिंडीत विठुरायाचे रूप, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या
अविनाश पवार
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. राज्यातून वेगवेगळ्या पालख्या आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे मार्गक्रम करत आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पंढरीच्या वारीत यंदा कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. प्रथमच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने पुण्यातून दिंडी काढण्यात आली आहे. या दिंडीत अनेक कलाकार सहभागी झाले होते. पुण्याच्या रस्त्यावर या कलाकारांनी विठू नामाच गरज केला. या दिंडीने पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले होतं.
या दिंडीत चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात ही दिंडी निघाली होती. विठ्ठलनामाच्या जयघोषात कलाकारांनीही भक्तीचा आनंद यावेळी लुटला. विशेष म्हणजे या दिंडीत केवळ कलाकारच नव्हे, तर विठुरायाचे रूप, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषाही साकारण्यात आली होती. या ऐतिहासिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेमुळे दिंडीला एक वेगळे आकर्षण प्राप्त झाले होते. या दिंडीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने पुढाकार घेतला होता.
वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असल्याचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. कलाकारांनीही वारकरी संप्रदायाच्या परंपरेत सहभागी होत विठ्ठलभक्तीचा अनुभव घेतला. पुण्यातून पहिल्यांदाच निघालेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून अशी दिंडी निघाली होती. अनुभव छान आहे. पहिलचं वर्ष आहे. सर्व कलाकारांसोबत चालताना वेगळाच आनंद आहे. त्यानिमित्ताने सर्व कलाकार एकत्र आले आहेत त्याचे समाधान आहे असं यावेळी निलम शिर्के यांनी सांगितलं.
25 जुलैला आषाढी वारी आहे. त्यामुळे सर्वा पालख्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कलाकारांची दिंडी ही आता निघाली आहे. या दिंडीत प्रमुख आणि मोठे कलाकार मात्र दिसले नाहीत. त्यामुळे ही एक वेगळी चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ही दाखल झाल्या आहेत. त्यानंतर त्या दिवे घाटातून पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भावीक पुण्यात आहेत.