- आषाढी वारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता सुविधा
- लोणी काळभोर येथील केंद्रात तीन अतिदक्षता खाटा आणि दोन ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे
- या केंद्रात २४ तास आयसीयू फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातून पायी मार्गक्रमण करीत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध ठिकाणी विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वारकरी तसेच इतर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन अतिदक्षता खाटांची तसेच दोन ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अपघात किंवा इतर गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्यांवर तातडीने उपचार करता यावेत, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.या केंद्रात 24 तास सेवेसाठी आयसीयू फिजिशियन,भूलतज्ज्ञ तसेच एक फिजिशियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, आपत्कालीन गरजेनुसार स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ आणि अस्थिरोगतज्ज्ञ हेही तत्परतेने सेवा देण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. वारी मार्गावरील भाविकांना दर्जेदार, तातडीची आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होऊन आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय व्यवस्थेकडे सुरक्षितरीत्या संदर्भित करता यावे, या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
आषाढी वारीच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधसाठा, जीवनरक्षक उपकरणे आणि आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आता वारी दरम्यान कोणती ही काळजी करण्याची गरज नाही. आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधान सरकार मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world