Pandharpur Vitthal Mandir Darshan: आषाढ महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांची पावले आता पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने वळू लागली आहेत. आषाढ सुरू होताच पंढरपुरात भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी किमान 10 तासांचा कालावधी लागत असून दर्शनाच्या रांगेत भाविकांची मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली असून दर्शन रांगेत कोणी घुसखोरी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा: Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास)
दर्शन रांगेत 20 हजारांहून अधिक भाविक
सध्या विठ्ठलाच्या दर्शन रांगेने गोपाळपूर रोडवरील सहा पत्राशेड ओलांडले असून रांग त्याबाहेर गेली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार सध्या दर्शन रांगेत किमान 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत. भाविकांची ही अलोट गर्दी पाहता त्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण गर्दीचा गैरफायदा घेत काही जण दर्शन रांगेत घुसखोरी करून गोंधळ उडवण्याची शक्यता असते. याला आळा घालण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कडक इशारा दिला आहे. "दर्शन रांगेत घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रकार आढळल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील," असे आदेश त्यांनी काढले आहेत.
(नक्की वाचा: Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा)
विठुरायाचे 24 तास दर्शन
यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) 25 जुलै रोजी आहे. या यात्रा कालावधीत म्हणजेच 15 जुलै ते 29 जुलैदरम्यान पंढरपुरात जवळपास 18 लाख ते 20 लाख भाविक दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांना वेळेत दर्शन मिळावे यासाठी 16 जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.