Ashadhi Wari 2026: पुणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीचा सागर अवतरणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा 9 ते 10 जुलै 2026 या कालावधीत पुणे शहरात संयुक्त मुक्काम असणार आहे. या भक्ती सोहळ्यासाठी आणि लाडक्या विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल
शहरातील वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध ठेवण्यासाठी पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पालखी मार्ग आणि त्या परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल लागू केले आहेत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून हे बदल करण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने आणि लग्नसमारंभाची वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )
'या' 10 ठिकाणी असेल पार्किंग
दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने सुरक्षितपणे उभी करता यावीत, यासाठी समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत विशेष वाहनतळांची (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक खालील अधिकृत जागांवर आपली वाहने पार्क करू शकतात.
रास्ता पेठ येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालय
कॉटर गेट चौकातील ऑर्नेलास हायस्कूल
नाना पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व कला महाविद्यालय
नेहरू रोडवरील लक्ष्मी मार्केट
रास्ता पेठ येथील स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय
भवानी पेठ येथील रफी अहमद किडवाई हायस्कूल
नाना पेठ येथील शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय
रास्ता पेठ येथील स. गो. बर्वे शाळा
नाना पेठ येथील मार्कंडेय विद्यालय
भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले शाळा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
पुणे शहर वाहतूक शाखेने सर्व भाविकांना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर कुठेही वाहन उभे न करता केवळ प्रशासनाने दिलेल्या अधिकृत वाहनतळाचाच वापर करावा, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीबाबत अधिक माहिती किंवा मदत हवी असल्यास भाविक वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षाच्या 726685000 किंवा 020-26684000 या दूरध्वनी क्रमांकांवर थेट संपर्क साधू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world