जाहिरात

Ashok Kharat: भोंदू खरातने भक्तांना कसं गंडवलं! परदेश दौऱ्यांसाठी दिलेली कारणं ऐकून सगळेच चक्रावले

भोंदू अशोक खरात हा भक्तांना लुटण्यासाठी प्रसिद्ध 'मारिओ' व्हिडिओ गेमसारखा प्लॅन आखत असे. दैवी शक्ती आणि 'पॉवर पॉईंट्स' मिळवण्याच्या नावाखाली त्याने अनेक श्रीमंत भक्तांकडून २१ हून अधिक देशांचे परदेश दौरे करवून घेतले.

Ashok Kharat: भोंदू खरातने भक्तांना कसं गंडवलं! परदेश दौऱ्यांसाठी दिलेली कारणं ऐकून सगळेच चक्रावले

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचे धक्कादायक कारनामे आतापर्यंत समोर आले आहेत. यात आणखी भर पडली आहे. ज्याप्रमाणे मारिओ गेममध्ये पॉईंट्स मिळवण्यासाठी विविध अडथळे पार करावे लागतात, अगदी त्याचप्रमाणे अशोक खरात या भोंदू बाबाने आपल्या भक्तांना लुटण्यासाठी एक 'पॉईंटगेम' रचला होता. दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी परदेश दौरे आवश्यक असल्याचे भासवून त्याने अनेक हायप्रोफाईल भक्तांना गंडा घातल्याचे NDTV मराठीच्या हाती ही एक्स्क्लुझिव्ह माहिती लागली आहे.

लहानपणी मारिओ गेम जवळपास सगळ्यांनीच आवडीने खेळला असेल. मारिओ गेममध्ये पॉईंट्स मिळवण्यासाठी मारिओ उड्या मारत ब्रिक्स फोडायचा, पाण्यातही पोहायचा, उंच भिंती चढत अवघड अशा स्टेजही पॉईंट्ससाठी त्याला पार कराव्या लागायच्या. दरम्यान मारिओ गेमप्रमाणे खरात चक्क भक्तांसोबत ट्रिक्स खेळायचा. 

अशोक खरात ऐशोआरामात जगण्यासाठी कुठल्याही स्तराला जायचा. विशेष म्हणजे परदेश दौरे करून घेण्यासाठी तो श्रीमंत आणि हायप्रोफाईल भक्तांना हुशारीने हेरायचा. दैवीशक्ती प्राप्त करून घेण्यासाठी मला पॉवर पॉईंटसची गरज आहे आणि ती सातासमुद्रापार विदेश दौरे केल्यावरच माझ्यामध्ये निर्माण होईल, असं तो भक्तांना सांगायचा. 

(नक्की वाचा-  LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर)

परदेश दौरा अन् दैवीशक्तीसाठी पॉईंट्स

एक फॉरेन टूर केली की 10 पॉईंट्स माझ्यात दैवीशक्ती प्राप्त होतील, असं तो भक्तांना सांगायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एका कोट्याधीश असलेल्या भक्ताला आपल्या लॉजिस्टिक व्यवसायाची किर्ती जगभरात पोहोचवायची होती. त्यासाठी त्याने खरातचा सल्ला घेण्याचे ठरवले होते. खरातने या भक्ताची आर्थिक क्षमता ओळखली आणि मग हुशारीने स्वतःमध्ये दैवीशक्ती असल्याचे भासवत फॉरेनचा गेमप्लॅन आखला. तुझ्या व्यवसायाला गती देण्यासाठी मला तुझी अवतार पूजा करावी लागेल. पण ही अवतार पूजा मी फक्त वर्षातुन एकदाच करतो. त्या पुजेकरिता लागणारे पॉवर पॉईंट्स हे जगातील 3 वेगवेगळ्या देशांना वर्षातून एकदा भेटी दिल्यानेच मला प्राप्त होईल. त्यानंतर मी तुझी वर्षाला एकदा अवतार पूजा करेन. 

वेगवेगळ्या देशांत तू हा व्यवसाय करणार असल्याने वेगवेगळ्या देशांत भेटी देवून मला प्राप्त झालेल्या पॉवर पॉईंट्सची दैवीशक्ती तुझी अवतार पूजा करून तुला देईन. त्यामुळे अवतार पूजेतून तुला जी परिसाची शक्ती प्राप्त होईल त्या शक्तीमुळे तुझा व्यवसाय जगात मोठा होईल असे खरातने सांगितले होते. एवढंच नाही तर तुझ्यात परिसाची शक्ती प्राप्त करणेकरीता 21 देशांमध्ये आपल्याला भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल अशी भीती घालून भोंदू खरात संबंधित भक्ताला विविध देशांमध्ये घेऊन गेला होता. 

ग्रीनलँडमधील 'स्वर्गाचा' बनाव

एका भक्ताला बाबाने सांगितले की, आपल्याला लवकर म्यानमार आणि त्यानंतर ग्रीनलँड या देशांत जाऊन तिथल्या मातीची पूजा करावी लागेल. असे झाले नाही तर काळी जादू काम करेल आणि तुझा मृत्यू होईल. त्यानंतर संबंधित श्रीमंत भक्त आपल्या एका मित्रासह खरातबाबाला ग्रीनलँड येथे घेऊन गेला. मला या निसर्गाच्या कुशीत निवांतात ध्यान करावे लागते, असे सांगत खरातने स्वतःसाठी हॉटेलमध्ये स्वतंत्र रूम बुक केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भक्तांना बाबाने स्वतःच्या रूममध्ये बोलावून घेतले आणि सांगितले की कैलास मानसरोवरला स्वर्गाचे पहिले टोक मानले जाते आणि ग्रीनलँडला स्वर्गाचे दुसरे टोक मानतात आणि आता मला स्वर्गात जाण्यासाठी ईश्वरीय संकेत मिळत असुन मी केव्हाही स्वर्गात जावू शकतो असं म्हणत खरात बाबा काहीतरी मंत्र पुटपुटत खाली फरशीवर झोपून गेला. 

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)

हे सगळं चित्र बघत बिथरलेल्या भक्तासह त्याच्या मित्राने बाबाचे पाय पकडले आणि तुम्ही स्वर्गात जावू नका, आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही आमच्यासोबत परत भारतात चला अशी विनवणी केली. तेव्हा बाबा उठून उभा राहिला आणि म्हणाला मला तुमच्या सारखे भक्त लाभले, तुमच्या हातून जगाचे कल्याण करण्याकरीता मी आता स्वर्गात जात नाही, मी जीवंत भारतात येतो. त्यानंतर दिवसभर ग्रीनलँडमध्ये विविध पर्यटनस्थळे फिरून आल्यानंतर सायंकाळी खरातने रूममध्ये भक्तांना बोलवत त्यांना डोळे बंद करायले लावत कोल्ड्रिंकच्या चवीचे पाणी प्यायला दिले. हे पाणी म्हणजे ग्रीनलँडचे पवित्र जल असल्याचे सांगत आपला दौरा यशस्वी झाल्याचे बोलून दाखवले होते.

2016 ते 2022 लुटीचा सुवर्णकाळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 ते 2022 हा अशोक खरातसाठी अक्षरशः सुवर्णकाळ होता. या सहा - सात वर्षात खरातने भक्तांकडून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, तिबेट यासह अनेक युरोपियन देशांचेचे दौरे करवून घेतले. प्रवासाचा खर्च, तिथे राहण्याचा, फिरण्याचा, जेवणाचा एवढेच नाही तर स्वतःच्या गोळ्या औषधांचाही खर्च तो भक्तांकडूनच करून घ्यायचा. खरातचे काळे कारनामे आणि त्याची भोंदूगिरी समोर येताच खरातला सातासमुद्रापार फिरवून आणणाऱ्या भक्तांनाही चांगलाच धक्का बसला आहे. काही भक्त पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत तर काहीजण भीतीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी तक्रार देण्यास घाबरत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com