Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये निकालांनंतर 'राडा'! भाजप उमेदवाराच्या घरावर मध्यरात्री दगडफेक

Chhatrapati Sambhajinagar Election Results: बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधी नगर भागात दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाला. मात्र या पराभवानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांसह आलेल्या टोळक्याने तुफान दगडफेक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.

वादाचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील या निवडणुकीत रिंगणात होते. "तुमच्यामुळेच मी निवडणूक हरलो," असा आरोप करत मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी बंटी चावरिया यांच्या घराला लक्ष्य केले. जुन्या वादातून आणि निवडणुकीतील पराभवाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

(नक्की वाचा-  TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

हा संपूर्ण हल्ला परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराच्या दिशेने दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. दगडफेकीमुळे घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून वाहनांचेही नुकसान झाले आहे.

(नक्की वाचा-  Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)

पोलीस कारवाई

या प्रकरणी बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावणे या कलमांखाली कारवाई सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Advertisement