Mumbai Local Train: मुंब्रा लोकल अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजा बसण्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत रेल्वेसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती. आता प्रत्यक्षात स्वयंचलित दरवाजा असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे.
कुर्ला कार शेड येथे नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा यशस्वी प्रयोग नुकताच करण्यात आला आहे. मयंक के मेहता यांनी दिलेल्या अहवालानुसार, हा प्रयोग यशस्वी झाला असून रेल्वे प्रशासनाने या नवीन प्रणालीची चाचणी घेतली आहे. या चाचणीदरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना हे स्वतः उपस्थित होते.
दरवाजांची रचना आणि कार्यप्रणाली
नॉन-एसी लोकलमध्ये बसवण्यात आलेले हे स्वयंचलित दरवाजे एसी लोकल ट्रेनच्या दरवाजांसारखेच आहेत. मात्र, नॉन-एसी लोकलसाठी खास विचार करून महिलांच्या एका डब्यात बसवण्यात आलेल्या या दरवाज्याला हवा खेळती रहावी यासाठी जाळ्या आणि फ्लॅप्स बसवण्यात आले आहेत. यामुळे पाऊस झाल्यास पाणी आत येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
हे दरवाजे 10 सेकंदांत आपोआप उघडतील आणि बंद होतील. ट्रेन सुरू असताना किंवा थांबत असताना, दरवाज्यांच्या हालचालीदरम्यान अलार्म सिस्टीम कार्यरत असेल, ज्यामुळे प्रवाशांना योग्य सूचना मिळेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत मुंबईतील गैर-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवणे आहे.