चांदूरबाजार येथील एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या पत्नीं नयना कडू (Prahar MLA Bachu Kadu's wife injured ) यांच्या अंगावर मंगल कार्यालयातील पिलरची टाइल्स पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. ही घटना 24 जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष राजेंद्र लंगोटे थूगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंगल कार्यालयाच्या संचालकाचे नाव आहे. बेलोरा येथील रहिवासी अनिल विधाते यांच्या मुलीचा लग्न समारंभ सोमवारी (24 जून) सकाळी चांदुर बाजार येथील माई वच्छलाबाई लंगोटे पॅलेस या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. नयना कडू या लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या. लग्न लागत असताना त्या मंगल कार्यालयातील पिलरजवळ बसल्या होत्या.
नक्की वाचा - लवकरच येतो सांगून घरातून गेला, तो आलाच नाही; अंबरनाथमध्ये उच्चशिक्षित तरुणाची हत्या
त्याचवेळी पिलरवरील दोन टाइल्स अचानक त्यांच्या अंगावर पडल्या. त्यात नयना कडू या जखमी झाल्या. त्यांना तातडीने तेथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी (Bachu Kadu) अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बबलू उर्फ तुषार नरेंद्र पावडे (45, बेलोरा) यांनी चांदूरबाजार ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.