निनाद करमरकर, प्रतिनिधी
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा रानमेवा, म्हणजेच काळीभोर जांभळं बाजारात दाखल झाली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय. या अवकाळी पावसामुळे जांभूळ पिकाचं मोठं नुकसान झालं असून पाव किलो जांभळांसाठी 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
बदलापूर जवळच्या एरंजाड, सोनिवली, जांभळा या गावांसह आसपासच्या खेड्यातील आदिवासी महिला जांभळाच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी बदलापूरच्या बाजारात येतात. मात्र अवकाळी पावसामुळे जांभळांचं नुकसान झाल्यानं एका पाटीचा भाव तब्बल अडीच हजार रुपयांवर पोहोचला आहे.
नक्की वाचा - Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय
बदलापूरची प्रसिद्ध जांभळं मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातात. हलवा, काला खट्टा, गिरवी अशा तीन प्रकारची जांभळं बाजारात उपलब्ध आहेत. आकारानं मोठी आणि चवीला अत्यंत गोड असल्यानं बदलापूरच्या जांभळांना बाजारात प्रचंड मागणी आहे. बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळालंय. मात्र यंदा अवकाळीमुळे जांभूळ पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता दिवसाला फक्त 15 ते 20 पाट्या बाजारात येतात. आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते, मात्र अवकाळी पावसामुळे आदिवासींचा हा हंगामी रोजगारही जाण्याच्या मार्गावर आहे.