Badlapur News: बदलापूरकर सध्या एका वेगळंच संकट सहन करत आहेत. या संकटाचे धागेदोरे थेट सातासमुद्रापार असलेल्या पश्चिम आशियातील युद्धाशी जोडले जात आहेत. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले असून, याचा फटका आता तुमच्या-आमच्या ताटातल्या जेवणापर्यंत पोहोचला आहे. मात्र, या जागतिक परिस्थितीचा फायदा घेत स्थानिक पातळीवर गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येत आहेत.
सरकारने व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही निर्बंध आणल्याने बदलापूरमधील लहान हॉटेल व्यावसायिक अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे शहरातील मोठ्या हॉटेल्सना मात्र हे व्यावसायिक सिलेंडर सहज उपलब्ध होत आहेत. "मोठ्यांचे खिसे गरम, मग त्यांना गॅस गरम कसा मिळतो?" असा संतप्त सवाल आता लहान हॉटेल चालक विचारत आहेत.
चुलीवरचे जेवण आणि 40 अंशाचा पारा
सिलेंडर मिळत नसल्याने पर्यायी मार्ग म्हणून अनेक लहान हॉटेल मालकांनी आता चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, निसर्गाची साथही त्यांना मिळत नाहीये. सध्या उन्हाळ्याचा कडाका इतका वाढला आहे की पाऱ्याने 40 अंशाचा आकडा ओलांडला आहे. बाहेर तळपणारे ऊन आणि आत चुलीची धग अशा दुहेरी कात्रीत कामगार सापडले आहेत. या उष्णतेमुळे अनेक कामगार आजारी पडत असून काहींना डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
लहान व्यवसायिकांची कोंडी
पश्चिम आशियातील युद्धाच्या सावलीमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असली, तरी त्याचा फटका केवळ गरिबांनाच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. "आम्ही लहान व्यावसायिक आहोत म्हणून आम्हाला सिलेंडर नाकारले जातात आणि मोठ्या हॉटेल्समध्ये मात्र सर्रास व्यावसायिक सिलेंडरचा वापर सुरू आहे," असा आरोप एका महिला हॉटेल व्यवसायीकाने केला आहे. हा सरळ सरळ सिलेंडरचा काळाबाजार असून यात कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
सरकारी हस्तक्षेपाची मागणी
बदलापूरमधील या परिस्थितीमुळे हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सिलेंडरचा हा कथित काळाबाजार थांबवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर मोठ्या हॉटेल्सना गॅस मिळू शकतो, तर तोच न्याय आम्हाला का नाही, असा सवाल करत भूमिपुत्रांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येत्या काळात या इंधन टंचाईचा परिणाम हॉटेलमधील जेवणाच्या दरांवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.