Badlapur News: बदलापूर एमआयडीसी परिसरातील वायू प्रदूषणाचे भीषण वास्तव एका रिक्षाचालकाने पुराव्यासह समोर आणले आहे. रात्री साडेदहा वाजेनंतर या परिसरात धुक्यासारखा दिसणारा पांढरा थर पसरतो, जो प्रत्यक्षात कंपन्यांमधून सोडलेला विषारी वायू असल्याचे समोर आले आहे.
रिक्षाचालकाचा 'व्हिडिओ' व्हायरल
स्थानिक रिक्षाचालक अभी गायकवाड यांनी या प्रदूषणाचे चित्रण केले आहे. रस्त्यावरील दिव्यांच्या उजेडात हा वायू स्पष्टपणे दिसून येतो. "हा गॅस स्लो पॉयझन आहे. रात्रीच्या वेळी हा वायू सोडला जातो आणि सकाळी जेव्हा नागरिक मॉर्निंग वॉक किंवा पोलीस भरतीच्या सरावासाठी धावायला येतात, तेव्हा हाच विषारी वायू नकळत त्यांच्या शरीरात जातो," असे गायकवाड यांनी सांगितले.
आरोग्यावर गंभीर परिणाम
बदलापूर शहरात सध्या खोकल्याची मोठी साथ आहे. हवामानातील बदलासोबतच एमआयडीसीमधून होणारे हे प्रदूषण या आजाराला अधिक खतपाणी घालत आहे. विशेषतः आपटेवाडी परिसरातील नागरिकांना या प्रदूषणाचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. 4 जानेवारीच्या रात्री हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
अंधाराचा फायदा घेतला जातोय?
गायकवाड यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की, रात्रीच्या वेळी एमआयडीसीमधील रस्त्यावरील दिवे का बंद असतात? "गॅस सोडताना कुणाला तो दिसू नये, म्हणून तर हे दिवे बंद ठेवले जात नाहीत ना?" अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे' (MPCB) अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, मंडळाचे अधिकारी या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.