Badlapur News : घरात राहायचं की मरणाची वाट पाहायची? बदलापुरात 400 कुटुंबांचा जीव मुठीत

Badlapur News : बदलापूरमधील म्हाडा कॉलनीतील रहिवाशांवर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Badlapur News : येथील नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत.
बदलापूर:

Badlapur News : बदलापूरमधील म्हाडा कॉलनीतील रहिवाशांवर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे. बीएसयूपी (BSUP) योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, येथील नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. कोणत्याही क्षणी घराचा स्लॅब अंगावर कोसळेल की काय, या भीतीने शेकडो कुटुंबांची झोप उडाली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

15 वर्षांपासून दुरुस्तीची प्रतीक्षा

बदलापूर पूर्वेकडील म्हाडा कॉलनी परिसरात साधारण 15 वर्षांपूर्वी बीएसयूपी योजनेतून 20 इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतींमध्ये आजघडीला जवळपास 400 कुटुंब राहतात. मात्र, या इमारती उभ्या राहिल्यापासून एकदाही त्यांची साधी डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. देखभालीच्या अभावामुळे या इमारती आता पूर्णपणे खिळखिळ्या झाल्या असून त्या राहण्यायोग्य उरल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

जीर्ण भिंती आणि कोसळणारे स्लॅब

या इमारतींच्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या असून त्यांना जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. जिन्यातील संरक्षक खिडक्या आणि कठडे आधीच कोसळले आहेत. सर्वात भयावह परिस्थिती घरांच्या आतमध्ये आहे. अनेक घरांच्या छताचा स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

सुदैवाने आतापर्यंत यात कोणाचा जीव गेला नसला तरी, एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भिंतीतून पाणी झिरपल्यामुळे घरांमध्ये ओल आली असून विजेचा शॉक लागण्याची भीतीही नागरिकांना सतावत आहे.

( नक्की वाचा : ओळख पटवणं होतं अशक्य, पण डोंबिवली पोलिसांनी करून दाखवलं! 3 वर्ष शेतात लपलेल्या खुन्याचा असा लागाला छडा )
 

या धोकादायक इमारतींचा प्रश्न स्थानिक नगरसेविका ज्योती दारविन यांनी नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला. इमारतींची दुरवस्था इतकी वाढली आहे की, पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रशासनाच्या भूमिकेकडे रहिवाशांचे लक्ष

एकीकडे नागरिक दहशतीखाली जगत असताना दुसरीकडे पालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 400 कुटुंबांच्या जीवाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी दर्शवली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन दुरुस्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article