Badlapur News : बदलापूरमधील त्या वादग्रस्त लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेला शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तुषार आपटेला अखेर आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. भाजपाने त्यांच्या नियुक्तीनंतर झालेला प्रचंड विरोध पाहून ही मोठी कारवाई केली आहे. आपटेच्या नियुक्तीमुळे विरोधकांकडून आणि सामान्य जनतेकडून भाजपावर मोठी टीका होत होती, ज्यामुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले.
काय आहे प्रकरण?
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2024 साली दोन लहान चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने चौथीतील एका चिमुरडीवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर बदलापूरकरांनी रेल्वे रोको करत आपला रोष व्यक्त केला होता आणि अनेक दिवस शहर बंद राहिले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे असला, तरी शाळेच्या व्यवस्थापनावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. शाळेचे सचिव म्हणून तुषार आपटे यांच्यावर या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
( नक्की वाचा : KDMC Election कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला )
या प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाने सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल होताच हे दोन्ही पदाधिकारी फरार झाले होते. जवळपास 35 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील एका फार्महाऊसमधून अटक केली होती.
राजकीय बक्षीस अंगाशी आले
नुकत्याच झालेल्या बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुषार आपटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच मदतीचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली होती. मात्र, एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि संवेदनशील प्रकरणातील आरोपीला लोकप्रतिनिधी बनवल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. सोशल मीडियापासून ते राजकीय व्यासपीठांपर्यंत भाजपाला लक्ष्य करण्यात आले.
नामुष्की टाळण्यासाठी कारवाई
वाढता विरोध आणि जनक्षोभ लक्षात घेता भाजपाने आपली प्रतिमा सावरण्यासाठी तुषार आपटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपटेने राजीनामा सादर केला आहे. बदलापूर प्रकरणातील जखमा अजूनही ताज्या असताना अशा प्रकारच्या नियुक्तीमुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. अखेर या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पक्षाने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे.