अमजद खान
रस्ते आणि खड्डे यांचे एक अतुट नाते असते. रस्त्याला खड्डा नाही असं उदाहरण दुर्मिळ म्हणावे लागेल. उलट जिथे रस्ता तिथे खड्डे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पावसाळ्यात तर ही समस्या मोठ्या प्रमाणात समोर येते. खड्डे पडतात आणि ते बुजवले ही जातात. पण असा एक खड्डा जो वर्षोनी वर्षे बुजवलाच जात नाही. तो त्याच ठिकाणी असतो आणि नागरिकांना त्रास देत असतो. अशाच एका खड्ड्याचा चक्क तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. ही घटना बदलापूरमध्ये घडली आहे. त्याचा व्हिडीओ ही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय या खड्ड्याच्या वाढदिवसाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.
कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या एक उड्डाण पुल आहे. या पुलाच्या पूर्व बाजूस गेल्या 3 वर्षांपासून एक मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या खड्ड्यामुळे उड्डाण पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्याबात वारंवार तक्रारी ही केल्या गेल्या. पण कारवाई शुन्य असल्याचा आरोर केला जात आहे. त्यामुळेच या खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीच्यावतीने या खड्ड्याचा थेट तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. हे एक उपहासात्मक आंदोलन होते.
या अनोख्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी खड्ड्यामध्ये केक कापून नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध नोंदवला. गेल्या तीन वर्षांपासून हा खड्डा प्रशासनाला दिसत नाही, त्यामुळे या लाडक्या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असा टोला आंदोलकांनी यावेळी लगावला. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उड्डाण पुलावरील हा खड्डा तातडीने न बुजवल्यास येत्या काळात पालिका प्रशासनाविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
बदलापूरात झालेल्या या आंदोलनाची चर्चा सगळीकडे होत आहे. हे अनोखे आंदोलन गरजेचे होते अशी प्रतिक्रीया ही नागरिक देत आहेत. खड्डा मोठा आहे. त्यामुळे त्यात कधी ही मोठा अपघात होवू शकतो. त्यानंतर प्रशासन जागं होणार आहे का असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आंदोलकांनी या खड्ड्यातच केक कापला. शिवाय तो केक त्या खड्ड्याला ही देण्यात आला. या आंदोलनानंतर तरी कुळगांव बदलापूर नगरपालिके प्रशासन जागे होणार आहे की नाही हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र या आंदोलनाने बदलापूरकरांच्या मनातली गोष्ट समोर आली आहे अशी चर्चा आहे.