मंगेश जोशी/ प्रशांत जव्हेरी
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका कथित ऑडिओ क्लिपने खळबळ उडवली आहे. ही ऑडिओ क्लिप भाजपाचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही क्लिप आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवाय खडसेंच्या मुलीबद्दल ही वाईट बोलण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील विजय चौधरी यांची भाजपच्या नेत्या व माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि भाजप नेते विजय चौधरी यांच्यात संवाद झाल्याचा दावा केला जात आहे. या कथित संभाषणात रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये खडसे यांना खालच्या पातळीवर जावून शिव्या देण्यात आल्या आहेत. तर खडसेंच्या मुलीच्या चारित्र्याबाबत या क्लिपमध्ये चर्चा केली गेली आहे. तर रक्षा खडसेंना पदावरून काढून टाकलं पाहीजे. हे सर्व मिळालेले आहेत असं ही यात चर्चा केली गेली आहे.
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की प्रसारित होत असलेल्या ऑडिओ क्लिपशी आपला कोणताही संबंध नाही. ही ऑडिओ क्लिप AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. शिवाय त्यात छेडछाड करण्यात आल्याचा दावा ही विजय चौधरी यांनी केला आहे. ऑडिओ क्लिप वरून त्यांच्यावर होणारे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तसेच या प्रकरणी नंदुरबार सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान उत्तर महाराष्ट्रात भाजप नेत्यांमधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भाजप नेत्या तथा माजी खासदार डॉ. हिना गावीत यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्या प्रकरणात रोहन गावीत यांच्या तक्रारीवरून विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळीही विजय चौधरी यांनी सर्व ऑडिओ क्लिप्स AI च्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच यापूर्वी मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या कथित संभाषणाच्या क्लिप्सही समोर आल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगली होती.
नक्की वाचा - Success Story: 14 वेळा अपयश, तरी ही डगमगली नाही, 15 व्या प्रयत्नात देशात 23 वी आली
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी संबंधित कथित संभाषणातील भाषेवर जोरदार टीका केली आहे. "गटाराचे झाकन उघडल्यावर जशी घाण ओसंडून वाहते, तशीच घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडत आहे." हिंदू संस्कृती आणि भारतीय सभ्यतेचा पुरस्कार करणाऱ्या पक्षातील नेत्यांकडून अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतर पक्षांतील महिलांबरोबरच स्वतःच्या पक्षातील महिलांबाबतही अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच भाजपमध्ये काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करत, "मुखात प्रभू श्रीरामांचे नाव आणि वर्तन मात्र रावणासारखे," अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील अशा नेत्यांवर कारवाई करावी आणि केवळ राजीनामा नव्हे, तर विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे. मागील काळात उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद हे अनेकदा समोर आले आहेत. मात्र आता कथित ऑडिओ क्लिप वरून भाजपमधील अंतर्गत राजकारण देखील ढवळून निघाले आहे. याप्रकरणी करण्यात आलेले आरोप, प्रत्यारोप, तक्रारी यावरून या संपूर्ण कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात तपासात नेमकं काय तथ्य समोर येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष व भाजप नेतृत्वाच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world