देवा राखुंडे
दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच बारामती तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा नग्न व्हिडीओ काढत तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका तरुणासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने पीडितेशी मैत्री केली होती आणि तिला कॅफेमध्ये नेत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
( नक्की वाचा: मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने कुटुंबाला बेदम मारहाण )
बारामती हादरली
एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी मैत्री करत तिला आरोपीने कॅफेमध्ये नेलं होतं. तिथे तिचा चोरून व्हिडीओ काढण्यात आला होता. यानंतर आरोपीने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरातील ही घटना असून या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनयभंगासह ॲट्रॉसिटीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
( नक्की वाचा: लग्नाआधी गर्भवती, पुढे लग्न लावलं, आदिती तटकरेंच्या मतदार संघात अल्पवयीन तरुणीसोबत भयंकर घडलं )
नेमकं काय झालं ?
डिसेंबर 2024 मध्ये तक्रारदार तरुणीची तिच्या एका मैत्रिणीने पार्थ याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानंतर फिर्यादी व पार्थ या दोघांचे मोबाईलवरून वरचेवर बोलणे होऊ लागले. जानेवारी 2025 मध्ये पीडितेचा वाढदिवस होता. यामुळे आरोपीने तिला पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका कॅफेमध्ये नेले आणि तिथे त्याने तिच्यासोबत फोटो काढले. 16 जानेवारी रोजी आरोपीने पीडितेला फोन केला होता आणि “तू मला खुप आवडतेस' “माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे असे म्हटले होते. पीडितेने त्याची मागणी धुडकावून लावली होती. त्यानंतरही आरोपीने पीडितेच्या मागे 'माझ्याशी रिलेशन ठेव' असं म्हणत तगादा लावला होता. यानंतर पीडिता कॅफेमध्ये बसलेली असताना आरोपीने तिचा एक व्हिडीओ काढला आणि तिला मिठी मारली. यानंतर हा व्हिडीओ घरच्यांना पाठवेन असे म्हणत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करत व्हॉटसअपवर व्हिडिओ कॉल केला. तिला सगळे कपडे काढायला लावले. आरोपीने स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने हा व्हिडीओ काढला. यानंतर त्याने पुन्हा पीडितेला धमकी दिली की माझ्याशी रिलेशन ठेवले नाही तर हा व्हिडीओ तुझ्या घरच्यांना पाठवेन. आरोपी पीडितेकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करण्यास सुरूवात केली होती. आरोपीने पीडितेचे फोटो तिच्या बहिणीला पाठवले होते तसेच अन्यही काही लोकांना पाठवले होते. पार्थ, रोहन, सूरज, हनुमंत, विजय व तुषार या सहा जणांनी पीडितेच्या बहिणीला पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर आरोपीने पीडितेच्या बहिणीला फोन करून तिने मला फसवले आहे, माझ्यासोबत रिलेशनमध्ये असताना तिचे आणखी 4-5 जणांसोबत रिलेशन होते असा आरोप आरोपीने केला होता. या सगळ्याला कंटाळून पीडितेने आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला.