Belasis Railway Flyover connecting Nagpada and Mumbai Central Railway station : नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा बेलासिस रेल्वे उड्डाणपुल तयार झाला असून २६ फेब्रुवारी रोजी प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या पुलामुळे पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा हा पूल दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावरील १३० वर्षे जुना ब्रिटिशकालीन उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर तो पूल तोडण्यात आला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची विक्रमी वेळेत पुनर्बांधणी केली आहे. महानगरपालिका पूल विभाग, स्थानिक विभाग कार्यालयाच्या प्रयत्नांना रेल्वे विभागाचे अभियंते, वाहतूक पोलिस अधिकारी यांची मोलाची साथ लाभली.
संघर्षाअंती दोन वर्षांनी पुलाचं बांधकाम पूर्ण....
या पुलाचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात 'बेस्ट' वाहिन्यांचे स्थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी निवासी बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची (Housing Society) बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, माननीय उच्च न्यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्धपणे केल्याने पावसाळ्याच्या ४ महिन्यांच्या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. भार चाचणी (Load Test), संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (Structural Stability Certificate), सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पुल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना - हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले आहे. एकंदरीत, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यास सज्ज आहे.
या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पुलाची रचना
- पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर
- पैकी पूर्वेला १३८.३९ मीटर आणि पश्चिमेला १५७.३९ मीटर
- रेल्वे हद्दीत ३६.९० मीटर अशी विभागणी
- वाहतूक मार्ग (Carriage Way) लांबी ७ मीटर
- दोन्ही बाजूला पुरेशा रूंदीचे पदपथ (Foothpath)
उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
- दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा
- पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार
- जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस मार्ग), डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार