Bhimashankar Jyotirlinga Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. विकास आराखड्यांतर्गत मंदिरात विविध तांत्रिक आणि बांधकामाची कामे करायची असल्याने, 3 महिने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीचा अहवाल आता जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर मंदिर नेमके कधी बंद होईल, याबाबतचा अधिकृत आदेश काढण्यात येईल. 'लोकसत्ता'ने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Kolhapur Robbery: कोल्हापुरात धावत्या बसवर दरोडा! 60 किलो चांदी, सोनं, रोख पैशांसह कोट्यवधी लुटले)
288 कोटींचा भव्य विकास आराखडा
भीमाशंकरच्या विकासासाठी सरकारने एकूण 288.17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित पाहुयात.
- दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि निवासाची सोय.
- पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची कामे.
- रस्ते, पार्किंग आणि परिसरातील स्वच्छता व्यवस्था.
2027 च्या कुंभमेळ्याचे नियोजन
2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यापूर्वीच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असताना पूजा-अर्चा किंवा पर्यायी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान ट्रस्ट लवकरच स्पष्टीकरण देणार आहे. भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.